‘ऑपरेशन सिंदूर’ हे बदलत्या भारताचे चित्र
‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना : लोकांमध्ये देशाभिमान वाढल्याबद्दल समाधान व्यक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 25 मे रोजी आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ अंतर्गत देशवासियांशी संवाद साधला. आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकवटला आहे. आपल्याला दहशतवादाला रोखावे लागेल. संपूर्ण देशाला ऑपरेशन सिंदूरचा अभिमान आहे. ही मोहीम बदलत्या भारताचे चित्र दर्शवते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘मन की बात’च्या 122 व्या भागात पंतप्रधान मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरच प्रकाशझोत टाकला. आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे, सर्वांना तो संपवायचा आहे. आपल्या सैन्याने सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी छावण्या अचूकतेने उद्ध्वस्त केल्या. ऑपरेशन सिंदूर मोहीम हे बदलत्या भारताचे प्रतिबिंब आहे. प्रत्येकजण देशभक्तीच्या भावनेने भरलेला आहे. भारताच्या अनेक भागात तिरंगा यात्रा काढण्यात आली. तसेच चंदीगडचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. यात मुले देशभक्तीपर चित्रे काढताना दिसली. नवजात बालकांचे नाव सिंदूर ठेवण्यात आले. अशा अनेक आठवणींवर पंतप्रधानांनी भाष्य केले.
सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांवर भारतीय सैन्याने केलेल्या अचूक हल्ल्यांचे पंतप्रधान मोदी यांनी ‘असाधारण’ म्हणून कौतुक केले. पंतप्रधानांनी या मोहिमेच्या यशाचे श्रेय भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेला दिले. भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रs, उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने हे आपल्या सैनिकांचे सर्वोच्च शौर्य होते, असे त्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर नंतर लोक देशभक्तीच्या भावनेने भरलेले आहेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की स्वदेशी उत्पादने निवडण्याची शपथ घ्या, यामुळे देशाच्या प्रगतीत सहभागी होण्याची तुमची तयारी दिसून येईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
नवजात बाळांचे नाव ‘सिंदूर’
अनेक शहरांमध्ये, तरुणांनी नागरी संरक्षणासाठी स्वयंसेवा केली, कविता लिहिल्या, संकल्पाची गाणी गायली आणि मुलांनी मजबूत संदेश देणारी चित्रे काढली, असे मोदी यांनी अलिकडेच बिकानेरला दिलेल्या भेटीचा संदर्भ देत सांगितले. बिकानेरमध्ये पंतप्रधानांना मुलांनी रेखाटलेली चित्रे भेट देण्यात आली होती. कटिहार आणि कुशीनगर सारख्या शहरांमधील कुटुंबांनी ‘ऑपरेशन’च्या सन्मानार्थ त्यांच्या नवजात बालकांचे नाव ‘सिंदूर’ ठेवले याबाबतही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
नक्षलवादाचाही उल्लेख
नक्षलवादाविरोधात सामूहिक लढाईमुळे हिंसाचारग्रस्त भागातही मूलभूत सुविधा पोहोचू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली जिह्यातील ‘काटेझारी’ नावाच्या गावात पहिल्यांदाच बस पोहोचली आहे. त्याचप्रमाणे छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये नक्षलप्रवण भागात पायाभूत सुविधांवर सरकारकडून भर दिला जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.