‘ऑपरेशन शाश्वत सागर’ची धडक कारवाई; मुणगेसमोरील समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्या पाच नौका ताब्यात
10 ते 12 वाव समुद्रात नियमांचे उल्लंघन
मुणगेसमोरील समुद्रात सुमारे 10 ते 12 वाव पाण्यात मत्स्यव्यवसाय विभागाचे पथक नियमित गस्त घालत असताना काही नौका संशयास्पदरीत्या मासेमारी करताना आढळल्या. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता संबंधित नौकांवर पर्ससीन जाळ्यांचा वापर करून नियमांचे उल्लंघन करत मासेमारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत पाचही नौका ताब्यात घेतल्या.
कारवाई करण्यात आलेल्या नौकांमध्ये अल मोहम्मदी-5 आरआर (IND-MH-5-MM-4429), आमिन-१ (IND-MH-5-MM-5493), अल-बुराक आरआर (IND-MH-5-MM-4163), फातिमा-२ (IND-MH-5-MM-5104) आणि फैजा यांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाची कारवाई
देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे आणि मालवणचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी गणेश टेमकर यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सागरी सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा रक्षकांनीही कारवाईत सहभाग घेतला. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहीम पार पडली.
अवैध मासेमारीविरोधात कठोर भूमिका
राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अवैध मासेमारीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्यावर विभागाचा भर आहे. या पार्श्वभूमीवर सागरी क्षेत्रातील गस्त आणि तपासणी मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
पारंपरिक मच्छिमारांना दिलासा
पर्ससीन मासेमारीच्या अवैध प्रकारांमुळे पारंपरिक मच्छिमारांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याची तक्रार सातत्याने केली जाते. त्यामुळे अशा मासेमारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक मच्छिमारांकडून होत आहे.
मुणगेसमोरील समुद्रात झालेल्या या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांना स्पष्ट संदेश मिळाल्याची भावना स्थानिक पारंपरिक मच्छिमारांमधून व्यक्त होत आहे. सागरी मासेमारीचे नियम मोडणाऱ्या नौकांविरोधात नियमित गस्त, तपासणी आणि संयुक्त कारवाया यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
