नवव्या दिवशीही ऑपरेशन गंगावळी सुरूच
गंगावळी नदीत ट्रक असल्याचे संकेत : शोधमोहिमेसाठी हेलिकॉप्टर
कारवार : अंकोला तालुक्यातील शिरूर दुर्घटनेतील बेपत्ता झालेल्यांचा आणि लॉरीचा शोध घेण्यासाठी हाती घेण्यात आलेले ऑपरेशन गंगावळी बुधवारी नवव्या दिवशीही सुरूच होते. शिरूर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वर 16 जुलै रोजी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील आजअखेर 8 मृतदेह हाती लागले असून अद्याप तीन जणांचा आणि एका ट्रकचा शोध लागलेला नाही. तब्बल नऊ दिवसानंतर राष्ट्रीय हमरस्त्यावर कोसळलेली दरड हटविण्यात आली आहे. तरीसुद्धा त्या तीन व्यक्तींचा आणि ट्रकचा शोध लागलेला नाही. बेपत्ता ट्रक आणि ट्रकचालक केरळमधील असल्याने केरळमधील स्थानिक आमदार, खासदार व बेपत्ता ट्रकचालकाच्या कुटुंबीयांनी ट्रकचालकाचा शोध घेण्याची मागणी लाऊन धरली आहे. केरळमधील स्थानिक आमदारांनी तर शिरूर येथे दाखल होऊन शोध मोहिमेची पाहणी केली. इतकेच नव्हे तर केरळमधील वकिलांनी ट्रकचालक बेपत्ता संदर्भात कर्नाटकातील न्यायालयात सार्वजनिक हितरक्षण याचिका दाखल केली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारलाही हा कळीचा मुद्दा बनून राहीला आहे. बेपत्ता व्यक्ती व ट्रक ढिगाऱ्याखाली गाढले गेल्याची आशा आता मावळली असून आता सर्वांनी आपली नजर गंगावळी नदीकडे वळविली आहे.
गंगावळी नदीत भारतीय नौसेनेच्या डायवर्सकडून बेपत्ता ट्रकचा आणि त्या तीन व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. शिरूर येथे दाखल झालेल्या 60 फूट लांबीच्या लाँग आर्मबुमर एक्सेवेटरचा वापर करून नदीत आणि काठावर ड्रेजींग करण्यात येत आहे. ड्रेजींग करताना एक प्रकारचा आवाज आल्याने ट्रक नदीतच असल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे आता गंगावळी नदीच्या पात्रात ड्रोन आधारित इंटलीजंट अंडर ग्राऊंड बरीड ऑब्जेट डिटेक्टिव सिस्टीमचा वापर करण्यात येत आहे. बेपत्ताचा शोध लावण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचा वापरही करण्याचा निर्णय घेतला असून आधुनिक रेडियम फ्रिक्वेन्सीस्कॅनरचा वापरही करण्यात येत आहे. शोध कार्यात एनडीआरएफ, एसडीआरएफ भारतीय सेना, अग्निशमन दल, आयआरबी कंपनीचे कर्मचारी गुंतले आहेत. या सर्वांच्या मदतीला सुरतकल येथील एनआयटी संस्थेतील तज्ञांची चार पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री कृष्ण भैरेगौड यांनी दिली आहे.
मयत महिलेच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
शिरूर दुर्घटनेनंतर उळूवरे येथील सण्णी गौडा ही वृद्धा बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह दुर्घटनेनंतर आठव्या दिवशी सापडला. बुधवारी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांनी मयत महिलेच्या पुत्राला पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी कारवारच्या जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया, जिल्हा पोलीसप्रमुख नारायण आदी उपस्थित होते.
पावसामुळे शोध कार्यात अडथळा
अंकोला तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत आहे. तरीही सर्व एजन्सीकडून युद्धपातळीवर शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वरील दरड हटविण्यात यश आले असले तरी सुरक्षिततेमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केलेली नाही. कारण येथे पुन्हा काहीही घडू शकते असा अंदाज वर्तविला आहे.
शाळा-महाविद्यालयांना आज सुटी
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. 25 रोजी कारवार जिल्ह्यातील 7 तालुक्यांतील शाळा व पदवीपूर्व महाविद्यालये, आयटीआय कॉलेज, डिप्लोमा कॉलेज यांना सुटी देण्यात आल्याची माहिती कारवारच्या जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी दिली आहे. कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, भटकळ, दांडेली व जोयडा या तालुक्यांमध्ये हा सुटीचा आदेश देण्यात आला आहे.