महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पॅरिस ऑलिम्पिकचे आज ‘न भूतो’ उद्घाटन

06:10 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खेळांच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंच्या पथकांचे पारंपरिक संचलन स्टेडियमऐवजी नदीतून, 10 हजार 500 खेळाडूंना घेऊन 100 नौका होणार सहभागी

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस

Advertisement

पॅरिसमध्ये आयोजित ऑलिम्पिकला आज शुक्रवारपासून सुरुवात होत असून त्याच्या पारंपरिक उद्घाटन सोहळ्याला मनमोहक व नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करण्याच्या दृष्टीने ही नगरी सज्ज झाली आहे. या सोहळ्याचे वेगळेपण म्हणजे आज जग प्रथमच स्टेडियमच्या बाहेर होणाऱ्या उद्घाटन समारंभाचे साक्षीदार होणार असून फ्रान्सची सारी राजधानीच त्यानिमित्ताने एका भव्य थिएटरमध्ये रुपांतरित होणार आहे. या सोहळ्यात पॅरिसच्या सर्वांत प्रतिष्ठित ठिकाणांच्या जवळून वाहणाऱ्या सीन नदीतील बोटींतून खेळाडूंचे पारंपरिक संचलन होणार आहे.

नदीच्या काठी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना आणि दर्शकांना फ्रेंच राजधानीच्या मध्यभागातून वाहणाऱ्या या नदीतील सदर संचलनाच्या माध्यमातून शहराचा समृद्ध इतिहास आणि नेत्रदीपक वास्तुकलेचे दर्शन घडेल. सीन ही शहराची मुख्य नदी असून स्टेडियममधील पारंपरिक ‘ट्रॅक’ची जागा ती घेईल आणि त्याचा काठ हा प्रेक्षकांचा स्टँड बनेल. पॅरिसच्या प्रसिद्ध ठिकाणांवर किरणे पडणाऱ्या मावळत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रंगेल.

ही अभिनव संकल्पना पॅरिसमधील समारंभाला प्रेक्षक आणि भौगोलिक व्याप्तीच्या दृष्टीने सर्वांत मोठा उद्घाटन सोहळा बनवणार आहे. जार्दिन डेस प्लांटेसच्या पुढील ऑस्टरलिट्झ पुलापासून सुऊवात करून हे संचलन सहा किलोमीटरांचे अंतर पार करेल आणि पश्चिमेकडे प्रवास करेल. यादरम्यान ऐतिहासिक पूल आणि प्रतिष्ठित ठिकाणांना वळसा घातला जाईल.  तसेच हा मार्ग खेळांच्या काही ठिकाणांजवळून देखील जाईल. अंदाजे 10,500 खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या जवळपास 100 नौका संचलनात सहभागी होतील. मोठ्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांसाठी त्यांच्यापुरत्या नौका असतील, तर छोट्या समित्यांना नौकांमध्ये एकत्र सामावून घेतले जाईल. डेकवर लावलेल्या

कॅमेरा उपकरणांमुळे प्रेक्षक खेळाडूंना जवळून पाहू शकतील आणि हा ऐतिहासिक प्रवास करताना त्यांच्या भावनांचे साक्षीदार होतील. सदर संचलन शेवटी ट्रोकाडेरोच्या समोर येईल, जिथे अधिकृत सोपस्कार पार पाडले जातील आणि ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. त्यासरशी पॅरिस ऑलिम्पिकचा अधिकृतपणे शुभारंभ होईल. अप्रतिम नियोजन, आखणी आणि चोख अंमलबजावणीमुळे हा उद्घाटन सोहळा ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वांत संस्मरणीय ठरणार आहे. आयोजन समितीचे प्रमुख टोनी एस्टँग्युएट यांनी या महत्त्वाकांक्षी सोहळ्याचे वर्णन करताना तो संपूर्ण शहराला एका विस्तीर्ण ऑलिम्पिक स्टेडियममध्ये रूपांतरित करणार असल्याचे म्हटले आहे.

या उद्घाटन सोहळ्यात खेळाडूंची 200 हून अधिक पथके सीन नदीमधून प्रवास करताना दिसतील आणि हजारो लोक नदीच्या दोन्ही बाजूंनी राहून हा  कार्यक्रम पाहतील. हजारो कलाकार आणि प्रभावशाली राजकीय व्यक्तीही त्यात झळकणार आहेत. फ्रान्सची ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची ही तिसरी खेप आहे. मागील दोन ऑलिम्पिकवर म्हणजे टोकियो येथे झालेले उन्हाळी खेळ आणि बीजिंगमध्ये झालेले हिंवाळी ऑलिम्पिक यावर कोविड महामारीचे सावट असल्याने मर्यादा पडल्या होत्या आणि प्रेक्षकांना दूर ठेवावे लागले होते. त्यामुळे या ऑलिम्पिकमधून प्रेक्षक पुन्हा स्टेडियम्समध्ये येणार आहेत. तसेच कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल. त्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 व जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article