For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थ्यांना जगभरात संधींची द्वारे खुली!

10:11 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थ्यांना जगभरात संधींची द्वारे खुली
Advertisement

डॉ. किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : मळगाव-सावंतवाडी येथे ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’चा ओरिएंटेशन प्रोग्रॅम

Advertisement

सावंतवाडी : कोकणातील माणसे नारळाच्या पाण्याप्रमाणे गोड आहेत. कोकणावरील प्रेम आणि मालवणचा नातू या नात्याने या भागाची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजतो. ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’च्या विविध कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगभरात संधांची द्वारे खुली होतील. हॉटेल व्यवसायात प्रचंड पैसा आहे. डोळे दिपतील अशा ठिकाणी तुम्ही काम करू शकाल, असे प्रतिपादन लोकमान्य ट्रस्टचे चेअरमन आणि ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी मळगाव-सावंतवाडी येथे केले. लोकमान्य एज्युकेशन ट्रस्ट संचालित माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या 2024-25 वर्षाच्या ओरिएंटेशन प्रोग्रॅमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

संस्थेच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालिका सई ठाकुर-बिजलानी, ‘तरुण भारत’च्या संचालिका रोमा ठाकुर, सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे संचालक पंढरी परब, लोकमान्य ट्रस्टचे संचालक अनंत उचगावकर, गोवा येथील हॉटेल ग्रँड हयातचे लर्निंग मॅनेजर आणि हयात हॉटेल्स कॉर्पोरेशनचे लर्निंग स्पेशालिस्ट प्रसाद पी. प्रभू, लोकमान्य सोसायटीचे शिक्षण समन्वयक डॉ. दत्तात्रय मिसाळे, माई इन्स्टिट्यूटचे  प्राचार्य अनिरुद्ध दास, ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, लोकमान्य एज्युकेशन’चे सिनिअर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभूकेळुसकर, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर उपस्थित होते.

Advertisement

व्यावसायिक शिक्षणावर भर!

ते पुढे म्हणाले, आता बी. ए., बी. कॉम. या पारंपरिक शिक्षणापेक्षा व्यावसायिक शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा गरजेच्या शिक्षणावर आता भर देण्यात येणार आहे. भविष्यात आर्टिफिशल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन यांसारखे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. बॅ. नाथ पै यांच्या नावे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ 200 एकर जागेत सुरू केले जाणार आहे. तेथे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाईल. कोकणवर आमचे प्रेम आहे. त्यामुळे या भागातील लोकांना भविष्यात अधिकाधिक शैक्षणिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ज्ञानदानासारखे पवित्र काम कुठलेही नाही. त्यामुळे ज्ञानदानाच्या क्षेत्रात मी माझ्या वडिलांचा वारसा घेऊन उतरलो आहे. माझे आजोबा देशभक्त शंकरराव गवाणकर यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी मालवणचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांच्या नावाने सावंतवाडीत बीएएमएस कॉलेज सुरू केले. साळगाव येथे हॉटेल मॅनेजमेंट, बी. एड. कॉलेजही सुरू करण्यात आले आहे. येथे शिक्षण घेऊन विद्यार्थी भविष्य घडवत आहेत. हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता जगभरात मागणी आहे. या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम नोकऱ्या मिळतील, ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील.

शैक्षणिक वारसा जपला!

स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझ्या वडिलांनी भाग घेतला. त्यांना शैक्षणिक क्षेत्राची आवड होती. त्यामुळे त्यांनी बेळगाव येथे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. त्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षक झाले. सावंतवाडीत बंद पडलेले राणी पार्वती देवी हायस्कूल माझ्या वडिलांनी बेळगाव येथे सुरू केले. हा वारसा मी पुढे सुरू ठेवला आहे. माझी आई माई ठाकुर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेतला होता. तिला स्वयंपाकाची आवड होती. तिच्या नावाने हे कॉलेज सुरू करण्यात आले आहे. माझी पत्नी रोमा ठाकुर यांनीच हे कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला, असेही ठाकुर म्हणाले. सिंधुदुर्गच्या विकासात आमचाही वाटा आहे. या भागात पहिले रिसॉर्ट ‘वाईल्डर नेस्ट’आम्ही सुरू केले. त्याशिवाय बेळगाव, गोवा भागात रिसॉर्ट सुरू केली आहेत. या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ठाकुर यांनी स्पष्ट केले.

हमखास जॉब मिळतील!

सध्याच्या काळात व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच जॉब हवा असतो. त्यादृष्टीने येथेही कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जॉब मिळतील. या व्यवसायात खूप मेहनत आहे. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये कठोर मेहनत घेऊन शिक्षण घ्यावे. त्यासाठी आवश्यक गेस्ट लेक्चरर्स, शेफ मुंबई आणि गोवा येथून उपलब्ध करण्यात येतील. या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठमोठ्या हॉटेलमध्ये जॉब मिळेल, असा विश्वास ठाकुर यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.