मालवणात पर्यटन व्यावसायिकांची खुली सभा संपन्न
पावसाळी पर्यटन उपक्रमांविषयी विशेष चर्चा
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संघटनांचे पदाधिकारी व पर्यटन व्यावसायिकांची खुली सभा मंगळवार, १० जून रोजी मालवण, धुरीवाडा येथील संस्कार सभागृहात संपन्न झाली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची रुपरेषा आखण्यात आली. तसेच कालबद्ध कृती कार्यक्रम ठरवून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात व्यावसायिकदृष्ट्या पावसाळी पर्यटन वाढीसाठी कशाप्रकारे उपक्रम घेता येतील, सोयीसुविधा, सवलती देता येतील यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, डाॅ. राहुल वालावलकर, प्रविण सामंत, प्रिया सामंत, गुरुनाथ राणे, सुनिल देसाई, देवेंद्र परब, हर्षल बांदेकर, ॲड. मिनल परब, अश्विनी परुळेकर, संजय केळुसकर, रवींद्र धुरी, मनोज मेथर, संजय वराडकर, द्वारकानाथ घुर्ये, राजन नाईक, रमाकांत वाक्कर आदी उपस्थित होते. कार्यवाह नितीन वाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सभेतील महत्वाचे निर्णय खालीलप्रमाणे आहेत.
अ) तात्काळ अंमलबजावणी साठी
१)जेष्ठ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा या दोन महिन्यांसाठी सर्वांनी आपापल्या हिशेबाने खास डिस्काउंट-सेल-सवलत योजना घोषित करणे.
२)परस्परांत सहयोग(टायअप) करून डिस्काऊंट कुपन चे वितरण करणे.
३) टूर ॲापरेटर्सशी संपर्क करून श्रावणात जिल्ह्यातील देवदर्शन पॅकेज टूर्स आखणे.
४)जिल्ह्याच्या पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक ब्लॅागर्सशी संपर्क करून त्यांचे मार्फत धबधबे व अन्य पावसाळी पर्यटन स्थळांची प्रसिद्धी मोहीम आखणे.
५)छोटे जंगल ट्रेल,हुक फिशिंग,क्रॅब कॅच,भातशेती सफर-कृषी पर्यटन,रिव्हर राफ्टींग आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्थानिकांशी संपर्क करून पॅकेजची आखणी व त्याची व्यापक प्रसिद्धी करणे.
६)पणजी-मालवण-पणजी वातानुकूलित शिवशाही बस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे.प्रत्येक तालुक्यात एक अशी पावसाळी सायकल मॅरेथॉन जुलै महिन्यात आयोजित करणे.
७)सप्टेंबर मधे सागर ते सह्याद्री अशी मोटारसायकल रॅली आयोजित करणे.
ब)दीर्घकालीन उपाययोजना
१)सिवर्ल्ड सारखे रखडलेले पर्यटन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे.
२) रो-रो सेवेच्या धर्तीवर कोकण रेल्वेची कार ॲान व्हिल्स सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणे.
३)चिपी विमानतळ नियमितपणे सुरू होण्यासाठी प्रयत्न करणे.
४)गाईड प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून त्या द्वारे जिल्ह्यातील अप्रकाशित पर्यटन स्थळांचा परीचय करून देणे.