बेळवट्टीत रेशनच्या तांदळाची राजरोषपणे खरेदी-विक्री
खरेदीसाठी आलेल्या रिक्षा चालकाला नागरिकांनी विचारला जाब : अन्नभाग्य योजनेचा दुरुपयोग
वार्ताहर/किणये
बेळवट्टी गावात राजरोसपणे रेशनच्या तांदळाची खरेदी व विक्री करण्यात येत आहे. काही नागरिकांना अधिक पैशाचे आमिष दाखवून रेशनचे तांदूळ खरेदी करण्यात येत आहेत. याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. त्यामुळे शनिवारी सायंकाळी गावातून रेशनचे तांदूळ घेऊन जाणाऱ्या एका रिक्षा चालकाला ग्रामस्थांनी अडवले आणि त्याला चांगलाच जाब विचारला आहे. या रिक्षात सुमारे दहा क्विंटल तांदूळ होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सरकारकडून अन्यभाग्य योजनेअंतर्गत बीपीएल रेशनकार्ड धारकाला प्रत्येक दहा किलो तांदूळ देण्यात येत आहेत. या योजनेचा अनेक गोरगरीब जनतेला लाभही होत आहे. या रेशनच्या तांदळामुळे अनेकांच्या रोजच्या भोजनाची व्यवस्था होत आहे. अशी परिस्थिती असताना काही मोजके लोकरेशनचा तांदूळ विक्री करू लागले आहेत.
गावावर परिणाम
जाब विचारताच सदर रिक्षा चालकाने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र संतप्त ग्रामस्थांनी रिक्षात रेशनचे तांदूळ आहेत. तुम्ही गावातून हे रेशनचे तांदूळ घेऊन जात आहात. असे प्रकार करू नका. अशी समज दिली. पण याचा परिणाम संपूर्ण गावावर होतो.
आहार खात्याच्या अधिकाऱ्यांना घेतले बोलावून
संतप्त ग्रामस्थांनी सदर रिक्षा चालकाला चांगलाच जाब विचारला यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा महादेवी मेदार, सदस्य मधु नलवडे, नामदेव गाडेकर, रामलिंग देसाई गोविंद, चौगुले मारुती कांबळे, एन. के. नलवडे, मुन्ना कांबळे आदी उपस्थित होते. त्यानंतर आहार खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना गावात बोलावून घेतले.
खरेदी करणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई करू
अधिकारी सुरेश उप्पार हे गावात दाखल होऊन रिक्षातील ‘त्या“ तांदळाची पाहणी केली. रेषेच्या तांदळाची खरेदी केलेल्या चालकावर आपण कारवाई करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
रेशनचे तांदूळ विक्री करणे थांबणे गरजेचे
ग्रामीण भागातील काही गावांमध्ये मोजकेच लोक गुपचूपपणे रेशनचे तांदूळ विक्री करतात. अशा प्रकारामुळे जर प्रशासनाकडून गोरगरीब जनतेला मिळणाऱ्या अन्यभाग्य योजनेवर परिणाम झाला तर सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे रेशनचे तांदूळ अथवा अन्यभाग योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी तांदळाची विक्री करणे थांबणे गरजेचे आहे.