For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेल उत्पादन वाढविणार ओपेक प्लस

06:57 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
तेल उत्पादन वाढविणार ओपेक प्लस
Advertisement

उपलब्ध होणार अधिक कच्चे तेल : जागतिक स्तरावरील दर कमी होण्याची मोठी शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ रियाध

कच्चे तेल उत्पादक समूह ओपेक प्लसने रविवारी जून महिन्यासाठी कच्च्या तेलाच्या उत्पादनाच्या कोट्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. युएईने अलिकडेच या समुहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. ओपेक प्लसच्या 7 सदस्य देशांनी (अल्जीरिया, इराक, कजाकिस्तान, कुवैत, ओमान, रशिया आणि सौदी अरेबिया) संयुक्तपणे 1.88 लाख बॅरल प्रतिदिन (बीपीडी) उत्पादन वाढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे कच्च्या तेलाचे जागतिक दर कमी होण्यासोबत उपलब्ध कच्च्या तेलाचे प्रमाण वाढू शकते.

Advertisement

कच्च्या तेलाच्या उत्पादनातील ही वृद्धी तेलबाजाराची स्थिरता कायम ठेवण्याच्या आमच्या सामूहिक प्रतिबद्धतेचा हिस्सा असल्याचे ओपेक प्लसने म्हटले आहे. मागील आठवड्यात उत्पादन कोट्यावरून दीर्घकाळापासून चालत आलेल्या असहमतीनंतर युएईने ओपेक आणि ओपेक प्लस दोन्ही समुहांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

अद्याप अनेक आव्हाने

तज्ञांनुसार ही वाढ पूर्वीपासून अनुमानित होती. युएईचा हिस्सा वगळता मार्च आणि एप्रिलमध्येही अशाच प्रकारे सुमारे 2 लाख बॅरल प्रतिदिनाची वाढ करण्यात आली होती.  उत्पादन कोट्यात ही वृद्धी केवळ कागदांपुरती मर्यादित राहू शकते, कारण अनेक सदस्य देश पूर्वीच स्वत:च्या निश्चित कोट्यापेक्षा कमी उत्पादन करत आहेत असे तज्ञांचे मानणे आहे.

होर्मुझ संकटाचा प्रभाव

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता, त्यानंतर आखाती क्षेत्रात तणाव निर्माण झाला. या युद्धाच्या प्रत्युत्तरादाखल इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी केली. या नाकाबंदीमुळे तेलाची निर्यात प्रभावित झाली आणि आखाती देशांच्या अतिरिक्त उत्पादन क्षमतेचा मोठा हिस्सा  सध्या जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकत नसल्याची स्थिती आहे.

ओपेक प्लसचा दुहेरी संदेश

रिस्टेड एनर्जीचे विश्लेषक जॉर्ज लियोन यांच्यानुसार ओपेक प्लसचा हा निर्णय केवळ उत्पादन वाढविण्यासाठी नव्हे तर एक रणनीतिक संदेश देखील आहे. या निर्णयाद्वारे ओपेक प्लस दोन संदेश देऊ पाहत आहे....

-युएई समुहातून बाहेर पडल्याने कामकाजावर कुठलाच प्रभाव पडणार नाही.

-युद्धानंतरही जागतिक तेलबाजारावर ओपेक प्लसचा प्रभाव कायम आहे.

भारतावरील ओपेक प्लसच्या निर्णयाचा प्रभाव

ओपेक प्लसकडून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय आणि युएई या समुहातून बाहेर पडण्याचा भारतावरील प्रभाव अत्यंत संमिश्र अन् महत्त्वपूर्ण असेल. भारत स्वत:च्या तेल आवश्यकतांचा जवळपास 85 टक्के हिस्सा आयात करतो, याचमुळे आखाती देशांमध्ये होणारी प्रत्येक घडामोड आमच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करते.  युएई बाहेर पडल्यावरही समूह सक्रीय राहिल्याने किमती अनियंत्रित होण्यापासून रोखू शकतो. भारतासाठी कच्च्या तेलाचे स्थिर दर पेट्रोल आणि डिझेलची किंमत नियंत्रणात ठेवण्यास मदत करणार आहे.

Advertisement
Tags :

.