कच्च्या तेलाच्या उत्पादनात ओपेक करणार वाढ
वृत्तसंस्था, दुबई
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमती म्हणजेच ब्रेंट व्रुड 71.73 डॉलर प्रति बॅरलवर राहिले होते. अलिकडच्या काळामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण पहायला मिळते आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने महागाई वाढीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविणे भारतासह अन्य देशांना शक्य होते आहे. याच दरम्यान ओपेक प्लस या संघटनेने कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महागाई कमी होणार
कच्च्या तेलाच्या किंमती अगदी 120 डॉलर व 85 डॉलर प्रति बॅरलवरुन 72 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरल्या आहेत. परिणामी महागाईवरचे शुक्लकाष्ट कमी होण्यास मोठी मदत मिळाली आहे. पश्चिम आशियातील युद्धाचा तणाव आता कमी झाला असून सर्व काही सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. होर्मुझ खाडीतून तेलाची व इतर साहित्याची जहाजांमार्गे वाहतूक सुरळीत झाली असल्याने भारतासह इतर देशांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे.
दररोज 1.88 लाख बॅरल अतिरीक्त उत्पादन
पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या किंमती वाढण्याची भीती कमी झाली आहे. याच दरम्यान ओपेक प्लस या संघटनेने कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून दररोज 1.88 लाख बॅरल अतिरिक्त तेलाचे उत्पादन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या उत्पादनाच्या वाढीसाठी सौदी अरब आणि रशिया हे दोन देश आघाडीवर असणार आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळात बाजारामध्ये आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात जादा कच्चे तेल पोहचू शकणार आहे. ओपेकच्या आकडेवारीनुसार मे मध्ये समुहाचे एकूण उत्पादन 3.313 कोटी बॅरल प्रति दिन इतके होते. यानंतर जूनमध्ये उत्पादनामध्ये हळूवारपणे सुधारणा करण्यात आल्या. आता ऑगस्टपासून उत्पादन उद्दिष्ट वाढविल्यानंतर तेलाचा पुरवठा वाढू शकणार आहे.
कोणत्या देशाकडून वाढणार पुरवठा
गेल्या काही महिन्यांपूर्वी पश्चिम आशियातील तणावामुळे तेलाचा पुरवठा अडथळ्यांसह सुरु होता. आता परिस्थिती सुधारत आहे. जगासाठी तेलासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा होर्मुझ हा मार्ग अखेर खुला झाल्यामुळे तेल आणि गॅस वाहून घेऊन जाणाऱ्या जहाजांची ये-जा सुरळीत झाली आहे. त्यामुळे आता पुरवठा नियमितपणे होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशांनी तेलाचा पुरवठा वाढविला आहे. सौदी अरबकडून होणारी तेल निर्यात युद्धापूर्वीच्या स्थितीत पोहोचली आहे. या सोबत संयुक्त अरब अमिरात या देशाने आपल्या तेलाची निर्यात युद्धापूर्वीप्रमाणे नियमित केली आहे. त्यामुळे जगभरामध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा सहजपणे होऊ शकतो आहे. गुंतवणूकदारांच्या मते बाजारामध्ये तेलाचा पुवरठा सातत्याने वाढीव राहिला आणि त्या तुलनेमध्ये मागणी मात्र कमी राहिली तर गरजेपेक्षा तेलाचा जास्त साठा राहू शकतो. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीवर दबाव येण्याची शक्यता आहे.