दिवाळीत फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तास मुभा
वन-पर्यावरणमंत्री ईश्वर खंडे यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील वर्षाप्रमाणेही यंदा देखील राज्य सरकारने दिवाळी कालावधीत फटाक्यांवर निर्बंध घातले आहेत. दिवसातून केवळ दोन तास फटाके फोडण्याची मुभा देण्यात आली आहे. रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचेही निर्देश आहेत, अशी माहिती वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिली.
बेंगळूरमध्ये शनिवारी पत्रकारांशी ते बोलत होते. रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडता येतील. केवळ हिरव्या फटाक्यांच्या (ग्रीन क्रॅकर्स) विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपोत्सवावेळी पर्यावरणाचे प्रदूषण नको. अत्यंत घातक रसायने नसणाऱ्या हिरव्या फटाक्यांचाच वापर करावा. याविषयी फटाके विक्रेत्यांकडूनही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. फटाके उडविल्याने अनेक वेळा दुर्घटना घडतात. काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. मुलांच्या डोळ्यांना दुखापती झाल्याच्याही घटना सातत्याने घडतात, असेही ते म्हणाले.