हिमाचलातून केवळ तीन महिला खासदार
पुढच्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक काही महिन्यांपूर्वी संमत करण्यात आले आहे. मात्र, ते लागू होण्यापूर्वी देशात जनगणना आणि मतदारसंघांचे परिसीमन होणे आवश्यक असल्याने या विधेयकांची क्रियान्वयन नंतर केले जाणार आहे. मात्र, सध्या महिला लोकप्रतिनिधींच्या संख्या अत्यल्प असल्याचे दिसून येते. हिमाचल प्रदेश हे या उदासिनतेचे प्रातिनिधिक उदाहरण असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
1971 मध्ये हे राज्य अस्तित्वात आले. त्याच्यानंतर आतापर्यंत या राज्यातून केवळ 3 महिला लोकसभेवर निवडणूक आल्या आहेत. या राज्यात लोकसभेच्या चार जागा आहेत. गेल्या 13 लोकसभा निवडणुका आणि चार पोटनिवडणुका धरुन या राज्याने आतापर्यंत 56 खासदार लोकसभेत धाडले असून त्यांच्यापैकी केवळ 3 महिला आहेत, अशी माहिती प्रसिद्ध झाली आहे. केवळ 1971 पासून नव्हे, तर गेल्या 72 वर्षांमध्ये या राज्यातून केवळ तीन महिला लोकसभेपर्यंत गेल्या आहेत.
यंदा दोन महिला उमेदवार
या राज्यात या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि सातव्या टप्प्यात 1 जूनला मतदान होणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाने चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत यांना उमेदवारी दिली आहे. तर बहुजन समाज पक्षानेही रेखा रानी यांना उतरविले आहे. कंगना राणावत या मंडी मतदारसंघातून, तर रेखा रानी या कांगडा मतदारसंघातून त्यांचे भविष्य आजमावीत आहेत
तीन महिला खासदार कोण ?
या राज्यातून आजवर लोकसभेत निवडून गेलेल्या तीन्ही महिला खासदार राजघराण्यांशी संबंधित आहेत. राजकुमारी अमृत कौर, चंद्रेश कुमारी आणि प्रतिभा सिंग अशी त्यांची नावे आहेत. राजकुमारी अमृत कौर या 1952 मध्ये लोकसभेवर निवडून आल्या होत्या. त्यांना नंतर आरोग्यमंत्रीपदही मिळाले होते. त्यावेळी हिमाचल प्रदेश हा बृहत पंजाब राज्याचा भाग होता. अमृत कौर या कपूरथळा राजघराण्यातील होत्या आणि मंडी मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
1984 मध्ये चंद्रेश कुमारी
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत 1984 मध्ये चंद्रेश कुमारी निवडून आल्या होत्या. त्या राजस्थानातील जोधपूर राजघराण्यातील होत्या पण त्यांचा विवाह हिमाचल प्रदेशातील राजघराण्यात झाला होता. राजघराण्यातीलच काँग्रेस नेते वीरभद्रसिंग यांच्या पत्नी प्रतिभासिंग या 1998 मध्ये पराभूत झाल्या होत्या. पण 2004 मध्ये त्यांनी विजय मिळविला होता.