For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरपेक्षतेने कर्म करणाऱ्याचीच देवाशी गाठ पडते

06:20 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
निरपेक्षतेने कर्म करणाऱ्याचीच देवाशी गाठ पडते
Advertisement

अध्याय सहावा

Advertisement

सर्वसामान्य माणसांची अशी समजूत असते की, अंगावर पडलेले काम टाळण्यासाठी मनुष्य संन्यास घेतो. संसारात असताना जर त्याला नेहमीचे करावे लागणारे कर्म आवडत नसले तर तो म्हणतो, हे कर्म बंधन करणारे आहे, हे मी टाळीन. अशा पद्धतीने नावडते कर्म तो टाळतो परंतु लगेच दुसरे आवडते कर्म करण्यास सुरवात करतो. ह्याप्रमाणे कर्माचा दास झाल्याने तो व्यर्थच कष्ट उपसत असतो. डोक्यावर असलेले गृहस्थाश्रमाचे ओझे टाकण्याकरता तो संन्यास घेतो पण संन्यासाश्रमातील कर्मांचे ओझे डोक्यावर घेतो. कर्मयोग आणि संन्यास ह्यातील मर्म नीट न समजून घेतल्याने ना धड गृहस्थाश्रम ना धड संन्यास अशी त्यांची अवस्था होते. हे लक्षात घेऊन दैनंदिन तसेच प्रसंगानुसार कर्मे निरपेक्षतेने करावीत म्हणजे कर्माचरणाची मर्यादा न उल्लंघता ज्ञानयोगाने सुख सहजच मिळते. ह्याबद्दल अधिक सांगताना भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, अर्जुना, ज्याला संन्यास म्हणतात तो योग म्हणजे माणसाला माझ्याशी जोडणारा दुवा आहे. त्यामुळे ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही तो योगी होत नाही.

संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प कोणी योगी न होतसे ।।2।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, वेदांत आणि मीमांसा ही सहा शास्त्रs हिंदू धर्मात आहेत. संन्यासी आणि योगी एकच असे त्यापैकी अनेक शास्त्रांनी मान्य केले आहे. केलेल्या कर्माच्या फळातून मी अमुक एक साध्य करीन असे संकल्प करण्याचे ज्याने थांबवले आहे त्यालाच योगाचे सर्वस्व म्हणजे ब्रह्म प्राप्त होते.

अर्जुनाला कर्तव्य म्हणून प्राप्त झालेले युद्ध करायचे नव्हते म्हणून संन्यास घेऊन तो ते टाळू पहात होता. हे देवांना आवडले नाही म्हणून कर्तव्यकर्म टाळून काहीच साध्य होणार नाही हे ते त्याला पटवून देत होते. कर्माचा त्याग करून कोणी संन्यासी होऊ शकत नाही हे त्यांनी ठामपणे सांगितले. आपणही बऱ्याचवेळा आवडत नाही म्हणून किंवा शारीरिक श्रम होतील म्हणून वा आळसाने आपले कर्तव्य कर्म टाळत असतो परंतु तसे करणे उचित नाही हे भगवंताच्या सांगण्यावरून लक्षात येते. त्याचे कारणही पुढील श्लोकात भगवंत सांगतात.

ते म्हणतात, ज्याला आत्म्याचे परमात्म्याशी मिलन हा उत्कृष्ट योग साधायचा आहे म्हणजे ज्याला ब्रह्मप्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे त्याने त्यासाठी कर्म हे साधन आहे हे लक्षात ठेवावे. हे करायचा ज्याने निश्चय केला आहे म्हणजे जो योगारूढ झालेला आहे त्याला ते स्थिर चित्ताने करण्यासाठी शम हे साधन सांगितले आहे.

योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले। योगी आरूढ तो होता शम साधन

बोलिले।। 3 ।।

कर्ममार्गाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचावयाचे असेल त्याने या कर्मरूपी पायऱ्या चुकवू नयेत. कर्ममार्गाने जाणारा यमनियमरूपी पायऱ्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो आणि मग प्राणायामच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर पोहोचतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.