केवळ परब्रह्म हे एकमेव विश्वव्यापी सत्य आहे
अध्याय सातवा
मृत्यूनंतर माणसाने सूर्यमार्गाने वाटचाल करावी म्हणजे आपण ब्रह्मलोकी पोहोचू असे ठरवले असल्यास पृथ्वीतलावर त्यानं समभावाची वर्तणूक ठेवायची आहे. समभावाची वर्तणूक ठेवायची म्हणजे ज्याच्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते निरपेक्षतेनं करायचं आणि हे सर्व जग भासमान आहे हे लक्षात घेऊन वागायचं.
माणसाला प्रत्येकाकडून काही अपेक्षा असतात किंवा आयुष्यात अमुक एक आपल्याला हवं असंही वाटत असतं पण समभावाने जो वागत असतो त्याला हे विश्व मिथ्या आहे ह्याची खात्री असल्याने त्याला मिथ्या जगाकडून कोणतीही अपेक्षा नसते. अपेक्षा नसल्याने अपेक्षाभंगाचे दु:खही त्याच्या वाट्याला येत नाही. त्यामुळे त्याला कुणाबद्दल राग, लोभ, द्वेष, असूया मत्सर वाटत नसतो. श्रीरामावतारात भगवंतांनी ह्याप्रकारे स्वत: वागून दाखवले आहे. त्या अवतारात त्यांनी ज्याच्यासाठी जे करायला हवं होतं ते आवर्जून केलं. आपल्या वागणुकीतून त्यांनी आदर्श वर्तणुकीचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. कैकयीने त्यांना चौदा वर्षे वनवासात पाठवलं म्हणून त्यांना तिच्याबद्दल बिलकुल राग नव्हता. हे सर्व आपल्या दैवानुसार घडलेलं आहे असे ते मानत असल्याने वनातही ते समाधानात राहिले होते.
श्रीरामांना आदर्श ठेऊन जीवनात वागणारा मृत्यूनंतर सूर्यमार्गाने ब्रह्मलोकी जाण्याचा अधिकारी होतो. हे विश्व जर नाशवंत आहे तर मग कायम टिकणारे ब्रह्म काय आहे ह्या प्रश्नाचे उत्तर देणारा क्षरं पञ्चात्मकं विद्धि तदन्तरक्षरं स्मृतम् । उभाभ्यां यदतिक्रान्तं शुद्धं विद्धि सनातनम् ।। 4 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार, पंचभूतात्मक जे ते क्षर व त्याच्या आत असणारे ते अक्षर होय. या दोहोंच्याहि जे पलीकडे शुद्ध व सनातन असते त्याला ब्रह्म असे म्हणतात.
क्षर म्हणजे नाश पावणारे आणि अक्षर म्हणजे नाश न पावणारे किंवा अविनाशी. हे शब्दार्थ लक्षात घेऊन पुढील विचारांचा अभ्यास करू. विश्वात दिसणाऱ्या सर्व स्थिर व हालचाल करणाऱ्या वस्तू पंचमहाभूतांपासून तयार होतात. जर ही पंचमहाभूते नश्वर म्हणजे कधी ना कधी नाश पावणारी आहेत तर त्यापासून तयार झालेल्या वस्तूही नश्वर असतात, हे नक्की. या सर्व वस्तूत असलेला आत्मा हा ईश्वरी अंश मात्र अक्षर असतो. या आत्म्याभोवती शरीररूपी नश्वर पदार्थाचे वेष्टण असते.
म्हणून बाप्पा म्हणतात की, क्षर पदार्थाच्या आत अक्षर पदार्थ असतो. जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा त्यातील नष्ट न होणारा आत्मा त्यातून निघून जातो व शरीर पंचमहाभूतात विलीन होते. माणूस आयुष्यात जे काही बरं वाईट वागला असेल त्याप्रमाणे आत्मा एकतर ईश्वरात विलीन होतो किंवा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. पण तो ईश्वरी अंश असल्याने कधीही नष्ट होत नाही आणि ही सर्व लीला करणारा ईश्वर, परब्रह्म हा या सगळ्याच्या पलीकडे असतो. तो कशानेच बाधित होत नाही. त्यानेच हे सर्व विश्व व्यापलेले आहे आणि ही सर्व सृष्टी, तसेच स्वर्गादि लोक ही त्याचीच लीला असून त्याच्या मर्जीनुसार तो ती उत्पन्न करतो व मर्जीनुसार नष्ट करतो. त्यामुळे सर्व सृष्टी केवळ भासमान आहे आणि ईश्वर किंवा परब्रह्म हे एकमेव सत्य असून त्यानेच सर्व विश्व व्यापलेलं आहे. भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये अर्जुनाने मी तुला कोणकोणत्या रुपात पाहू असे भगवंताना विचारले. त्यावर ते म्हणाले की, अर्जुना दिसणारी प्रत्येक गोष्ट ही माझीच विभूती असून मी सर्वव्यापी आहे आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी माझ्यातला केवळ एक अंश पुरेसा आहे. यावरून आपल्याला ईश्वरी तत्व व त्याची अफाट ताकद याची कल्पना येते.
क्रमश: