एकच स्वच्छतागृह 73 महिलांसाठी
जपान हा देश अत्यंत प्रगत आहे. त्या देशाला स्वत:ची प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीची जोपासना करतच या देशाने पाश्चिमात्य संस्कृतीचाही स्वीकार केला आहे. आज या देशातील शिक्षण, जीवनमान, आचारविचार, राज्यपद्धती आणि इतर महत्वाच्या बाबी पाश्चात्य देशांप्रमाणे आहेत. तथापि, एक बाब अत्यंत खटकणारी असून तिची चर्चा केवळ जपानमध्येच नव्हे, तर साऱ्या जगभरात केली जात आहे.

या देशाच्या संसदेच्या वास्तूत महिला संसद सदस्यांसाठी केवळ एकच स्वच्छतागृह (टॉयलेट किंवा वॉशरुम) आहे. या देशाच्या संसदेत थोड्याथोडक्या नव्हे, तर 73 महिला सदस्या आहेत. इतक्या संख्येने असणाऱ्या महिला सदस्यांसाठी केवळ एकच स्वच्छतागृह असणे, या देशाची समृद्धी आणि संस्कृती पाहता, अनेकांना योग्य वाटत नाही. महिला संसद सदस्यांमध्येही यामुळे नाराजी आहे. स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, अशी मागणी करणारे आवेदनपत्र विविध राजकीय पक्षांच्या 60 महिला सदस्यांनी सभागृहाच्या व्यवस्थापनाला सादर केले आहे. 73 महिला सदस्यांसाठी एकच स्वच्छतागृह असल्याने त्याच्या बाहेर बऱ्याचदा लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. एका महिला सदस्याने तर या प्रकाराचा निषेध म्हणून संसद सत्रकाळात स्वच्छता गृहात जाण्याचेच सोडून दिले आहे. आता, जपानसारख्या देशात अशी स्थिती असावी याचे अनेकांना आश्चर्य वाटते. पण, याचे कारण असे आहे, की संसदेच्या या वास्तूची निर्मिती 1936 मध्ये झाली होती. तेव्हा महिलांना निवडणुकीत भाग घेता येत नव्हता आणि त्यांना मतदानाचा अधिकारही नव्हता. साहजिकच, त्यांच्यासाठी स्वच्छतागृह नव्हते. पण आता परिस्थिती वेगळी आहे. महिला निवडून येतात. तसेच त्यांना मतदानाचा अधिकारही आहे. पण संसदेची रचना मात्र पूर्वीप्रमाणेच असल्याचे दिसून येते.