लाखो मनुष्यांमध्ये एखाद्यालाच ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय हे जाणण्याची इच्छा असते
भगवंत अर्जुनाला म्हणाले, परमार्थात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ते झाले की, माणसाला आपण कोण आहोत, आपले स्वरूप काय आहे हे समजते. ते समजण्यासाठी बुद्धीची गरज नसते. बुद्धीची गरज व्यवहारात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे पण आपण कोण आहोत हे समजण्यासाठी बुद्धीची गरज नसल्याने ती सद्गुरुंना अर्पण करायची असते. त्यांच्या कृपेने आत्मज्ञान झाले की, शिष्य स्वस्थ होऊन स्वरूपात मग्न होतो. हे झाले आत्मज्ञानाबद्दल. आता विज्ञान म्हणजे काय हे सांगायचे झाले तर विज्ञान म्हणजे मी मांडलेला विश्वाचा पसारा होय. ह्याला माझा प्रपंच म्हणलास तरी चालेल. हा खरा आहे असे समजणे हेच अज्ञान होय. तो समोर दिसत असला तरी काही काळाने नाश पावणारा आहे म्हणून त्याला मिथ्या असे म्हणतात. हे लक्षात आले की, माणसाचे संपूर्ण लक्ष आत्मस्वरुपाकडे लागते. प्रपंचाचा विसर पडून तो आत्मस्वरूपात स्थिर होतो.
आता समत्वबुद्धीबद्दल जे मी सांगणार आहे ते खरं तर गूढ म्हणजे समजायला अवघड आहे पण ते थोडंसं जरी समजलं तरी मनाचे पूर्ण समाधान होईल. त्याला समत्वबुद्धी प्राप्त होईल. माणसाला जन्मत: असलेली बुद्धी व्यवहारात त्याचा फायदा कशात आहे हे दाखवण्यापुरती उपयोगी असते परंतु समोर दिसणारी दुनिया खरी आहे हे अज्ञान नष्ट झाले की, समत्वबुद्धी प्राप्त होते. तिच्यामुळे त्याच्या मनातील हा आपला तो परका हा भेद नष्ट होतो. समत्वबुद्धीमुळे ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षपणे करण्यास तो सुरवात करतो. त्यामुळे त्याच्या हातून नेहमीच योग्य ती कर्मे होत राहतात.
ह्या अध्यायामध्ये भगवंत ज्ञानी माणसाला मुक्ती कशी मिळते, अज्ञानी मनुष्य त्याच्या वागणुकीमुळे जन्ममृत्युच्या चक्रात कसा अडकतो हे सांगून त्यातून त्याने कसे सुटावे हेही सांगणार आहेत. अर्थात हे सर्व विवेचन समजले तरी त्याप्रमाणे वागण्याचे काम माणसाने स्वत:हून करावयाचे आहे.
जो प्रपंचाच्या मोहात अडकतो त्याला आत्मस्वरूपाचा विसर पडतो आणि दुर्दैवाने जवळजवळ सगळेच लोक प्रपंचाच्या मोहात अडकलेले असतात. म्हणून भगवंत पुढील श्लोकात सांगतात, लक्षावधी लोकांमध्ये एखादा आत्मज्ञानाच्या सिद्धीसाठी यत्न करतो. त्या यत्न करणाऱ्या सिद्ध मनुष्यांमध्ये एखादाच मला खऱ्या अर्थाने जाणतो.
लक्षावधींत एखादा मोक्षार्थ झटतो कधी। झटणाऱ्यात एखादा तत्त्वता जाणतो मज।।3।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की, लाखो मनुष्यांमध्ये एखाद्यालाच ज्ञान आणि विज्ञान ह्यातील फरक जाणण्याची इच्छा असते व अशी इच्छा करणाऱ्या अनेक लोकांमधील एखाद्यालाच स्वरूपज्ञान होते. ज्याप्रमाणे अनेक लोकातून चांगले चांगले निवडून मोठे सैन्य तयार करतात आणि युद्धप्रसंगात शस्त्रांचे घाव झेलून त्यातील एखादाच विजयी होतो त्याप्रमाणे स्वरूपज्ञानाच्या इच्छारूप पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात पण त्याची प्राप्ती करून देणाऱ्या पलिकडच्या काठाला एखादाच लागतो.
क्रमश: