मंड्या मतदारसंघातून कुमारस्वामीच निवडणूक रिंगणात
निजदच्या उमेदवारांची घोषणा : हासनमध्ये प्रज्ज्वल रेवण्णा यांनाच तिकीट
प्रतिनिधी/ बेंगळूर
लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी काँग्रेसला आव्हान देण्यासाठी भाजप आणि निजदने युती केली आहे. राज्यातील 28 पैकी 25 जागा भाजप तर 3 जागा निजद लढविणार आहे. मंगळवारी निजदच्या कार्यकारिणी बैठकीनंतर तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मंड्या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, हासनमधून विद्यमान खासदार प्रज्ज्वल रेवण्णा आणि कोलारमधून मल्लेश बाबू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपने 24 मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले आहेत. या पक्षाकडून अद्याप चित्रदुर्गचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. दरम्यान, मंगळवारी भाजपचा मित्रपक्ष निधर्मी जनता दलाने उमेदवारांची घोषणा केली. मंड्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार, याविषयी निजदमध्ये बरीच खलबते खाली. मागील निवडणुकीत निजदने मंड्या मतदारसंघात कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांना रिंगणात उतरविले होते. परंतु, त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी कुमारस्वामी हे मंड्या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यास तयार झाले आहेत. या मतदारसंघात भाजपच्या तिकिटाची अपेक्षा बाळगलेल्या अपक्ष खासदार सुमलता अंबरिश यांची निराशा झाली होती. त्यामुळे सुमलता यांच्या भूमिकेकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत हासन मतदारसंघातून निजदचे प्रज्ज्वल रेवण्णा निवडून आले होते. यावेळी देखील त्यांनाच तिकीट देण्यात आले आहे. कोलार मतदारसंघातून समृद्धी मंजुनाथ, मल्लेश बाबू आणि निसर्ग नारायणस्वामी यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेरच्या क्षणी मल्लेश बाबू यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.