इस्रायलची केवळ कठोर निंदा, अमेरिकेचा पडला विसर
57 इस्लामिक देशांची संघटना ‘ओआयसी’वर प्रश्नचिन्ह
मुस्लीम देशांची संघटना इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) विदेश मंत्र्यांची परिषद तुर्कियेच्या इस्तंबुलमध्ये पार पडली आहे. बैठकीनंतर ओआयसीने स्वत:चे घोषणापत्र जारी केले. यात गाझा, इराणमधील संघर्षाचा उल्लेख आहे, परंतु अमेरिकेबद्दल ओआयसी नरमाईच्या भूमिकेत दिसून आला. अखेर इस्लामिक जगताच्या नेतृत्वाचा दावा करणारी 57 देशांची संघटना अमेरिकेच्या विरोधात काही बोलण्याची हिंमत का जमवू शकला नाही असा प्रश्न मुस्लीम जगतातून विचारला जात आहे.
ओआयसी दशकांपासून मुस्लीम जगताला प्रभावित करणाऱ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर कठोर वक्तव्यं जारी करण्याव्यतिरिक्त काही खास करण्यासाठी ओळखला जात नाही. इराण विरोधात अमेरिका-इस्रायलने केलेल्या कारवाईप्रकरणी अशाच प्रकारचा पॅटर्न दिसुन आला. ओआयसीने इस्तंबुल येथे अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, घोषणापत्रात इस्रायलच्या कारवाईची निंदा करण्यात आली. परंतु अमेरिकेच्या विरोधात वक्तव्य करणे प्रकर्षाने टाळण्यात आले.