घरकुल प्रदर्शनाला मोजकेच दिवस शिल्लक
रियल इस्टेट-बांधकाम क्षेत्राला सुवर्णसंधी : 170 हून अधिक स्टॉल
बेळगाव : गृहनिर्माण क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, साहित्य तसेच गृहनिर्माण प्रकल्प एकाच छताखाली पाहण्याची संधी ‘तरुण भारत’ पुरस्कृत ‘घरकुल-2024’ प्रदर्शनाने देऊ केली आहे. 21 ते 26 नोव्हेंबरदरम्यान बेळगावच्या सीपीएड मैदानावर रियल इस्टेट तसेच बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठे प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनाला अवघे मोजकेच दिवस शिल्लक असून याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव व कन्सल्टींग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन भरविले जात आहे. यावर्षी प्रदर्शनाला प्रियाशक्ती स्टील हे डायमंड प्रायोजक तसेच अल्ट्राटेक सिमेंट हे गोल्ड प्रायोजक लाभले आहेत. 11 वे घरकुल प्रदर्शन भव्यदिव्य होण्यासाठी सीपीएड मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. ग्राहकांना सर्व प्रकारची माहिती मिळावी, यासाठी 170 हून अधिक स्टॉल मांडण्यात आले आहेत. त्यामुळे गृहनिर्माणासोबतच खाद्यपदार्थांचा आस्वाद प्रदर्शनात घेता येणार आहे.
आपलेही एखादे घरकुल असावे, ही प्रत्येकाची इच्छा असते. घरकुलाचे काम सुरू असताना त्यामध्ये कोणते नवीन तंत्रज्ञान, साहित्य वापरले जावे याविषयी सविस्तर माहिती नसते. ही माहिती घरकुल प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे. मागील दहा प्रदर्शनांना केवळ बेळगावच नाही तर गोवा, कोल्हापूर, कोकण, हुबळी या परिसरातूनही रियल इस्टेट क्षेत्रातील शेकडो उद्योजकांनी भेटी दिल्या आहेत. घराच्या बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू, खडी, दरवाजे, खिडक्या, वॉटरप्रुफिंग, गार्डनचे साहित्य, सोलार, इन्शुरन्स, नवीन पद्धतीचे नळ यासह इतर साहित्य एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. बेळगाव व कोकणातील हे एकमेव भव्य रियल इस्टेट प्रदर्शन असल्याने मोठा प्रतिसाद यापूर्वी मिळाला आहे. यावेळीही रियल इस्टेट क्षेत्रातील नवीन संकल्पनांचा समावेश प्रदर्शनात करण्यात आला आहे.
मोजकेच स्टॉल शिल्लक
प्रदर्शनात 170 हून अधिक स्टॉल समाविष्ट करण्यात आले आहेत. यापैकी आता मोजकेच स्टॉल उपलब्ध आहेत. गृहनिर्माण क्षेत्रासोबतच गृहोपयोगी साहित्य व खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक स्टॉलधारकांनी 9449056936, 9448116468, 9341873944 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.