For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपकडून दहा वर्षांत केवळ खोटी आश्वासने

11:13 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपकडून दहा वर्षांत केवळ खोटी आश्वासने
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा टोला : गोकाक येथे मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रजाध्वनी मेळावा

Advertisement

बेळगाव : काँग्रेस पक्षाने दिलेले वचन पाळले आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारकडून देशातील जनतेला खोटी आश्वासने दिली जात आहेत. भाजप सरकारने केवळ महागाई, बेरोजगारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप केंद्रात कदापिही सत्तेवर येणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. गोकाक येथील वाल्मिकी मैदानावर मंगळवारी काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ पक्षाकडून प्रजाध्वनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या निवडणुकीमध्ये मतदारांकडून दिला जाणारा कौल देशाचे भविष्य बदलणारा कौल आहे. केंद्राकडून देण्यात आलेली आश्वासने पाळली आहेत का?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला खोटे बोलून वेळ मारुन नेली आहे. दहा वर्षांत केवळ खोटी आश्वासने दिली आहेत, असा आरोप त्यांनी केला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अन्न सुरक्षा कायदा अंमलात आणला. मात्र याचा लाभ भाजपकडून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कायद्यामुळेच गोरगरिबानां मोफत धान्य मिळत आहे. तर विदेशातील बँकांमध्ये असणारा काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन मोदी यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र दहा वर्षांत 15 रुपयेही जमा करण्यात आलेले नाही. प्रत्येक वर्षात 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र दहा वर्षांत 20 लाख रोजगारही उपलब्ध करुन देण्यात आले नाहीत. उलट बेरोजगारांची संख्या वाढल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.

महागाई, बेरोजगारी वाढत चालत चालली आहे. याला भाजप सरकार कारणीभूत आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. उत्पन्न वाढले नाहीत. उलट शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेण्यासाठी दुप्पट खर्च करावा लागत आहे. हे वास्तव आहे. याबाबत मतदारांनी विचार करावा. तर जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. 414 रुपयाला मिळणार सिलिंडर गॅस आता 950 रुपये मोजावे लागत आहे. डिझेल, पेट्रोल या इंधनांचे भाव दुप्पट झाले आहेत. वाढती महागाई ही भाजपचीच देन आहे. अच्छे दिन कोठे आहेत? असा सवाल मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी करुन केंद्र सरकारवर निशाना साधला. भाजपकडून भावनात्मक विचारांवर राजकारण केले जात आहे. मतदारांनी याचा विचार करुन निर्णय द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वामध्ये सत्तेवर आलेले सरकार लोकसभा निवडणुकीनंतर कोसळणार असल्याचे वारंवार गोकाकच्या आमदारांकडून सांगितले जात आहे. मात्र हे तितके सोपे नाही. सरकार पाडविण्याची तुमची नैतिकता आहे का? असा सवाल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. काँग्रेस पक्ष म्हणजे वचनबध्द, सर्व जातीधर्म एकत्रित घेवून देशाची संस्कृती पाळणारा पक्ष. सर्व जातीधर्माला अधिकार देणारा पक्ष. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांची नेतृत्वामध्ये जारी गेलेल्या पाच गॅरंटी योजना गोरगरीबांसाठी वरदान ठरल्या आहेत. मागासवर्गीयांसाठी अनेक योजना राबवून सरकार गरीबांच्या बाजुने असल्याचे दाखवून दिले आहे, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी जिल्ह्याला नेहमीच दुय्यम लेखले आहे. जनतेच्या कष्टाच्या काळात मदतीला न येता निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागायला येतात. जिल्ह्याच्या विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर अभियांत्रिकी पदवीधर असून मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द आहेत. यासाठी मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, आमदार लक्ष्मण सवदी, भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश, राजू सेठ, पुट्टरंग शेट्टी, नयना मोटम्मा, केरळचे आमदार रोजी जान, विधान परिषद सदस्य नागराजु यादव, मागासवर्गीय विकास निगमचे अध्यक्ष पल्लवी जी., भोवी निगमचे अध्यक्ष प्रवीणकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.