मद्यपीच करत आहेत निदर्शने
शिक्षकांची संघटना, बँकर्सची संघटना, विद्यार्थी संघटना, पोलीस असोसिएशन, डॉक्टरांची संघटना असते. परंतु मद्यपींनी स्वत:च्या हक्काच्या लढाईसाठी संघटना स्थापन केली आहे. आफ्रिकेच्या घाना या देशात मद्यपींची संघटना असून या लोकांनी सरकारला स्वत:च्या मागण्यांवरून अल्टीमेटम देखील दिला आहे. घानामध्ये रितसर मद्यपींनी संघटना स्थापन करत मद्याच्या वाढत्या किमती कमी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या संघटनेचे 66 लाखाहून अधिक सदस्य आहेत. मागील आठवड्यात या संघटनेचे अध्यक्ष मोसेस ओन्याह यांनी मद्याच्या वाढत्या किमतींची निंदा केली आहे. घानामध्ये मोसेस ओन्याह यांना ‘ड्राय बोन’ या नावानेही संबोधिले जाते.
सेडीमध्ये काही मजबुती आली असून काही वस्तूंच्या किमती कमी झाल्याचे आम्हाला कळले आहे. परंतु मद्याच्या किमती अद्याप अधिक आहेत असे ड्राय बोन यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. घानाचे राष्ट्रीय चलन सेडीच्या आश्चर्यजनक मूल्यवृद्धीमुळे मद्याच्या किमतीत सातत्याने वाढ हेतेय. याचमुळे मद्यपी संघटनेने 11 शहरांमध्ये मोर्चा काढत सरकारला मद्याच्या किमती कमी करण्याचे आवाहन केले आहे.
सरकारला तीन आठवड्यांचा अल्टीमेटम
डंकर्ड्स असोसिएशनने घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा आणि व्यापार तसेच उद्योगमंत्र्यांना याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरकारला या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी तीन आठवड्यांची मुदत दिली. यानंतर देशव्यापी निदर्शने केली जातील असे संघटनेने म्हटले आहे.
देशातील जबाबदार संघटना
आम्ही केवळ मद्यपी नसून जबाबदार नागरिक आहोत. किफायतशीर पेयाची मागणी करत आहोत. मद्याच्या वाढत्या किमती घानावासीयांना त्रासदायक ठरत आहेत. घानाचे डंकर्ड असोसिएशन जबाबदारीने मद्यपान करण्यास प्रोत्साहन देते, तसेच मद्यपान करून वाहन चालविण्याच्या धोक्यांविषयी जागरुकता वाढविण्यासाठी अभियानं राबविली असल्याचा दावा ड्राय बोन यांनी केला.