कोल्हापूरसाठी रेल्वे अधिकाऱ्यांच्या घोषणाच
कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर या रेल्वे स्थानकांची पाहणी करण्यासाठी या विभागातील सरव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वर्षातून चार ते पाच वेळा दौरा होतो. या दौऱ्यात अधिकाऱ्यांसमोर प्रवाशांच्या समस्या मांडल्या जातात. त्यावेळी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न करु असे आश्वासन मिळते. अधिकाऱ्यांच्या प्रत्येक दौऱ्यात कोल्हापूर-कोकण रेल्वेचे काम कुठेपर्यंत आले आहे हा प्रश्न ठरलेला असतो. प्रत्येकवेळी सर्व्हे सुरु आहे किंवा सर्व्हे झाला आहे. प्रस्ताव समितीकडे पाठवला आहे असे सांगण्यात येते. मात्र अद्याप तरी कोल्हापूर-कोकण या रेल्वेच्या मार्गाचे काम तसूभरही पुढे गेले नाही. अन्य मागण्याबाबतही अशीच स्थिती आहे.
कोल्हापूर-मिरज या मार्गाचे दुहेरीकरण हा कोल्हापूर रेल्वेचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. दुहेरीकरण झाले तरच कोल्हापूर रेल्वेच्या माध्यमातून देशातील मोठया शहराशी जोडले जावू शकते. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून दुहेरीकरणाची मागणी होत आहे. कोल्हापूर-पुणे-मुंबई या मार्गावर प्रवाशांची संख्या खूप वाढली आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गावर रेल्वेने प्रवास करतात. कोल्हापूर-मिरज-सातारा या मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे सुध्दा फुल्ल असतात. कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेसचे वर्षभर आरक्षण असते. यामुळे ऐनवेळी या गाडीचे आरक्षित तिकिट मिळत नाही. यासाठी या मार्गावर सुपरफास्ट गाडी तसेच कोल्हापूरातून पुण्यामध्ये जाणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. यासाठी कोल्हापूर-पुणे अशी शटल सर्व्हिस सुरु करण्याची मागणी आहे. कोरोना काळात कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सह्याद्री एक्सप्रेसही सुरु करण्याची मागणीही प्रलंबित आहे.
राणी चन्नमा एक्सप्रेस कोल्हापूरऐवजी मिरजेतून सोडण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. कोल्हापूर-शिर्डीसाठी गाडी सुरु करण्याची मागणी होती. त्याची सुध्दा फक्त चर्चा झाली. कोल्हापूर रेल्वेशी संबंधित मागण्यापैकी एकाही कामाची अंमलबजावणी झाली नाही. दौऱ्यावर येणारे अधिकारी सकाळी लवकर कोल्हापुरात येतात. यानंतर श्री अंबाबाईचे दर्शन घेतात.
दर्शनानंतर रेल्वे स्थानकाच्या पाहणीचा केवळ फार्स होतो. त्यातून एखाद्या अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले जातात. प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरच्या प्रश्नासंबंधी विचारल्यास करेंगे, वरिष्ठांना कळवू असे सांगून पुढील दौऱ्याला निघून जातात. 11 मार्चच्या सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या दौऱ्यातही अशीच उत्तरे ऐकायला मिळाली. आता पुढील दौऱ्यात येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांपुढे हेच प्रश्न आणि हेच उत्तर ऐकायचे आहे.
- केंद्र,राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापूर रेल्वेला ठेंगाच
केंद्राच्या किंवा राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापूरसाठी नवीन गाड्या,निधी मिळेल अशी अपेक्षा होतड. पण गेल्या तीन वर्षात कोल्हापूर रेल्वेला ठेंगा दाखवण्यात आला आहे. यामुळे दुहेरीकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील काही रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम करण्यात येत आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा या योजनेत समावेश असून 42 कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्विकासाचे काम सुरु आहे.
- अधिकाऱ्यांच्या दौऱ्याने फरक नाही
रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी कोल्हापूर आणि मिरज रेल्वे स्थानकाला भेट देतात.पण रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत प्रश्नांकडे एकही अधिकारी लक्ष देत नाही.यामुळे त्यांच्या दौऱ्याने रेल्वेच्या कामात फरक पडला नाही किंवा कामेही झाली नाहीत.
सतीश साखळकर- रेल्वे नागरिक जागृती मंच