Koyna Dam | मान्सूनची पाठ फिरली; कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या उंबरठ्यावर
सांगली-मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय घट होत आहे. जलाशयातील पाणीसाठा चिंताजनक असतानाही १ जूनपासून म्हणजे यावर्षीचे तांत्रिक जल वर्ष सुरू झाल्यापासून कोयना जल विद्युत प्रकल्पाच्या विविध टप्यातून एकूण २५.५१७ दशलक्ष युनिटची वीजनिर्मिती झाली असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे.
जून महिना अर्धा संपला तरी पावसाचे माहेरघर असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले नसल्याने जलाशयातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या कोयना धरणाच्या जलाशयात एकूण १३. ५८ टक्के व त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा फक्त ९ टक्के शिल्लक राहिल्याने प्रशासनासह महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयाची धडधड वाढली आहे. सर्वांचे लक्ष आता उर्वरित पाणीसाठ्याचे नियोजन कसे केले जाणार याकडे लागून राहिले आहे. धरणातील पाणीसाठ्यात अद्याप पाण्याची आवक सुरूझालीच नसल्याने पाणीपातळीत सातत्याने घट होत आहे.
सद्या कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात एकूण पाणीसाठा १३.५९ टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा फक्त ९ टीएमसी शिल्लक राहिला आहे.कोरडा होत चाललेला जलाशय पाहून सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना नवीन तांत्रिक जल वर्षात म्हणजे १ जून २०२६ पासून १३जून २०२६ या तेरा दिवसात कोयना जल विद्युत प्रकल्पाच्या टप्पा १, २, ३, ४ व कोयना पायथा बीजगृहातून मिळून एकूण २५.५१७ दशलक्ष युनिटची बीज निर्मिती झाली असल्याची दिलासादायक माहिती महानिर्मिती विभागाकडून समोर आली आहे.
बीज निर्मिती झाल्याची माहिती दिलासादायक असली तरी कोयना धरणाला आता पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.१४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात ९ टक्के म्हणजे ९. १८ टीएमसी पाणीसाठा असून पाण्याची पातळी २०४०.०५ फूट झाली आहे.