सीबी टू परीक्षेमध्ये केवळ 650 शिक्षक झाले उत्तीर्ण
उर्वरित 950 शिक्षकांसमोर यक्षप्रश्न : ‘टीईटी’साठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी
पणजी : शिक्षण खात्याने नव्याने शिक्षण भरतीसाठी घेतलेल्या सीबी 2 परीक्षेमध्ये चौदाशेपैकी केवळ 650 जण उत्तीर्ण ठरले असून उर्वरित 950 जणांसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) परीक्षेला बसण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदत द्यावी, अशी मागणी शिक्षकवर्गाने सरकारकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा सक्तीची ठरविली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय सीबीटू परीक्षेत उत्तीर्ण ठरविले जात नाही.
अलीकडेच सरकारने 352 शिक्षक भरण्यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविले होते. त्यानंतर सीबीटू ही परीक्षा कर्मचारी भरती आयोगामार्फत घेण्यात आली. तथापि एकूण चौदाशेव्यक्ती या परीक्षेला बसल्या. त्यापैकी केवळ 650 जणांची निवड करण्यात आली. सीबीटू मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक तेवढे गुण प्राप्त केले तरी देखील ही मंडळी अनुत्तीर्ण ठरली. कारण सर्वात कठीण परीक्षा म्हणजे टीईटी, त्यामध्ये काही शिक्षक अनुत्तीर्ण ठरले.
टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत म्हणून त्यांना सीबी टू परीक्षेमध्ये आवश्यक गुण मिळवून देखील ही मंडळी निवडली गेली नाही. 950 शिक्षक बाहेर पडले. त्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना देखील निवेदन दिले आणि आम्हाला टीईटी परीक्षेसाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. शिक्षणखाते देखील कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे या शिक्षकांना पुढे शिक्षक म्हणून सरकार आपली निवड करणार की नाही? याबाबत चिंता पडली आहे. यातील काही शिक्षक गेली दहा वर्षे, काही शिक्षक पाच वर्षे सेवा बजावीत आहेत.
त्यातील काही शिक्षकांचे वय 40 ते 45 पर्यंत पुढे पोहोचले आहे. केवळ टीईटी परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत म्हणून सीबी टू परीक्षेत आवश्यक ते गुण पडून देखील अनुत्तीर्ण ठरतात. गोवा सरकारच्या शिक्षण खात्याला केवळ 352 शिक्षकांची पदे भरावयाची आहेत. 650 जण जरी निवडले तरी त्यातून 350 जणांची निवड होईल. त्यानंतर उर्वरिताना ज्या ज्या वेळी पदे रिक्त होतील त्या त्या वेळी सामील करून घेऊन ही पदे भरली जाणार आहेत. मात्र जे 950 जण बाहेर पडले आहेत, त्यांच्यासमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने यासाठी थोडी सवलत द्यावी अशी मागणी या वंचित शिक्षकवर्गाने केली आहे.