For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राणप्रतिष्ठाप्रसंगी गर्भगृहात मोदी-योगींसह केवळ 5 जण

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
प्राणप्रतिष्ठाप्रसंगी गर्भगृहात मोदी योगींसह केवळ 5 जण
Advertisement

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे चोख पूर्वनियोजन : रामलल्लाला आरसा दाखवण्याचा विधी पंतप्रधान करणार

Advertisement

गर्भगृहातील उपस्थित...

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • राज्यपाल आनंदीबेन पटेल
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
  • सरसंघचालक मोहन भागवत
  • मुख्य पुजारी (आचार्य)

वृत्तसंस्था /अयोध्या

Advertisement

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साह आहे. याचदरम्यान, राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. अभिषेकावेळी गर्भगृहामध्ये केवळ पाच जण उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्य पुजारी गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे चोख नियोजन केले जात आहे. पूजाविधीअंतर्गत केले जाणारे विविध कार्यक्रम कशा पद्धतीने करावेत याची पूर्ण आखणी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकावेळी पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, सरसंघचालक आणि मंदिराचे आचार्य (मुख्य पुजारी) गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठेवेळी पडदा बंद राहील. प्रथम भगवान रामाला आरसा दाखवला जाईल. ज्यामध्ये रामलल्लाचा चेहरा दिसणार आहे.

पुजाऱ्यांची तीन पथके निश्चित

पूजाविधीसाठी पुजाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.  पहिल्या संघाचे नेतृत्व स्वामी गोविंद देव गिरी करतील. दुसऱ्या संघाचे नेतृत्व शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती करतील. विजयेंद्र सरस्वती हे कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य आहेत. तर काशीतील 21 पुजाऱ्यांना तिसऱ्या टीममध्ये ठेवण्यात आले आहे.

सुसज्जतेची तयारी सुरू

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठा जनसमुदाय अयोध्येत पोहोचण्याची शक्मयता असून त्यादृष्टीने शहरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातत्याने तयारीचा आढावा घेत आहेत. या कार्यक्रमासाठी काशी विश्वनाथ आणि वैष्णोदेवी मंदिरांच्या प्रमुखांसह सुमारे चार हजार संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. सध्या, विविध कामे पूर्ण करण्यासाठी 4,000 हून अधिक लोक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पूर्वतयारी करत आहेत. अभिषेक सोहळ्यापूर्वी शहरातील प्रमुख मार्ग सुर्यस्तंभांनी सुशोभित करण्यात येत आहेत. अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या 23 दिवस आधी म्हणजे शनिवार, 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदी अयोध्येत येत आहेत. ते श्रीराम विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करतील. त्यापूर्वी ते रोड शो करणार आहेत. याआधी मंदिर ट्रस्ट रामलल्लाच्या तीन मूर्तींपैकी एकाची निवड करेल. 29 डिसेंबर रोजी मूर्तीची निवड होणार आहे. या रामललाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे. या नियोजनासाठी ट्रस्टच्यावतीने सलग दोन दिवस बैठकांचे सत्र सुरू आहे.

चार दिवस वेगवेगळे विधी

19 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून मंदिरात वेगवेगळे धार्मिक विधी सुरू होणार आहेत. 20 जानेवारीला सूर्योदयापूर्वी मुहूर्तावर शुद्धीकरणाचा संकल्प होईल. पंडित गणेश्वर शास्त्री यांनीच काशी कॉरिडॉरचे उद्घाटन आणि राम मंदिराच्या पायाभरणीसाठी वेळ निश्चित केली. मुख्य प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सुमारे 1 मिनिट 24 सेकंद चालणार असून ही वेळ काशीच्या पंडितांनीच निश्चित केली आहे. 22 जानेवारी रोजी दुपारी 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 वाजून 32 सेकंदांपर्यंत चालेल, असे सांगण्यात आले.

गर्भगृहात सीतेची मूर्ती नसणार : चंपत राय

70 एकरांवर उभारले जाणारे मुख्य मंदिर 360 फूट लांब आणि 235 फूट ऊंद असेल. मंदिराचे शिखर 161 फूट उंच असेल. रामलल्ला ज्या संकुलात राहणार आहेत त्या गर्भगृहात जाण्यासाठी 32 पायऱ्या चढाव्या लागतील. राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती बसवण्यात येणार आहे. गर्भगृहातील मूर्ती पाच वर्षीय मुलाच्या रुपात असणार आहे. ही मूर्ती देवाच्या बालस्वरूपाची असल्याने मंदिरात माता सीतेची मूर्ती असणार नाही. गर्भगृहात स्थापित होणारी मूर्ती बाल स्वरुपातील असल्यामुळे मुख्य मंदिरात सीतेची मूर्ती दिसणार नाही, असे चंपत राय यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.