For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाच वर्षात जिल्हयात केवळ ३८ नेत्रदाते

03:56 PM Jun 10, 2025 IST | Radhika Patil
पाच वर्षात जिल्हयात केवळ ३८ नेत्रदाते
Advertisement

दापोली / प्रतीक तुपे :

Advertisement

एखाद्या अपघाताने आलेल्या अंधत्वामुळे संपूर्ण जीवनच अंध:कारमय झालेल्यांना मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात पाच वर्षात केवळ ३८ नेत्रदात्यांनी आपल्या नेत्रदानासाठी अर्ज नोंद केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयात नेत्रपेढी आहे. यावर्षीपासून डेरवण येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढीची निर्मिती करण्यात आली आहे.

अचानक झालेल्या अपघातामुळे तसेच जन्मतः किंवा आजाराने आलेल्या अंधत्वामुळे अनेकांना दृष्टिहीन जीवन जगावे लागते. यामुळे अनेकांना आयुष्यभर अंधाराचा सामना करावा लागतो. जन्मतः अंधत्व असलेल्यांना आपल्याला कधी हे निसर्गाचे सौंदर्य, प्रकाश पहायला मिळेल अशी आशा लागून असते. परंतु नेत्रदाते नसल्याने अशा बालकांना, व्यक्तींना आयुष्यभर अंधत्व उराशी बाळगून जगावे लागते. अनेकांना मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा असते.

Advertisement

परंतु नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज - गैरसमज आहेत. चेहरा विद्रुप होत असल्याचा सर्वात मोठा गैरसमज सध्या लोकांमध्ये आहे. अशा चुकीच्या गैरसमजांमुळे इच्छा असूनही अनेकजण नेत्रदानासारख्या निर्णयाकडे पाठ फिरवत असल्याचे समोर आले आहे.

  • जनजागृती गरजेची

समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो असा विचार करणाऱ्या अनेकांनी देहदान, अवयवदानाचा संकल्प केल्याचे समोर आले आहे. त्यात नेत्रदानाबाबत गैरसमज असल्याने रत्नागिरी जिल्हयात अल्प प्रमाणात नेत्रदानाची नोंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे नेत्रदानाबाबत जनजागृती करणे आता गरजचे बनले आहे. एकंदरीत यामध्ये १ वर्षांवरील व्यक्ती नेत्रदान होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने जिवंतपणी नेत्रदानाची लेखी इच्छा व्यक्त करणे गरजेचे आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ तासांच्या कालावधीत नेत्रदान होणे गरजेचे आहे. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी तत्काळ नेत्रपेढीत संपर्क साधून नेत्रदानाविषयी कळवले पाहिजे. त्यानंतर दृष्टीहिनांना मागणीनुसार या नेत्रपेढीतून नेत्रदान करण्यात येते.

  • कोरोनामध्ये एकही अर्ज नाही

जिल्ह्यात २०२०-२०२१ यावर्षी कोरोनामुळे कोणीही अर्ज भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर २०२१-२२मध्ये २, २०२२-२३मध्ये १० जणांनी, २०२३-२४मध्ये ०६ जणांनी, २०२४-२५मध्ये १० जणांनी, २०२५-२६ मध्ये १० जणांनी अशा एकूण ३८ नेत्रदात्यांनी नेत्रदानासाठी रत्नागिरी जिल्हा नेत्रपेढीत नोंद केली आहे.

  • मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा

नेत्रदान करण्याचे प्रमाण कोकणात फारच कमी आहे. धर्म, रुढी, परंपरा, गैरसमज यामुळे मरणोत्तर नेत्रदान करायला नातेवाईक तयार होत नाही. बऱ्याच वेळा पुरुष मंडळी तयार होतात. पण मरणोत्तर व्यक्तीची पत्नी व मुली नेत्रदानाकरिता तयार होत नाहीत. एका व्यक्तीच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे ज्यांचे आयुष्य अंधकारमय झाले अशा दोन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होऊ शकतो. तरी जास्तीत जास्त व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

                                                                                    - डॉ. पवन सावंत, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक, रत्नागिरी

Advertisement
Tags :

.