For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी केंद्राकडून केवळ 20 कोटींची तरतूद

10:54 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव धारवाड रेल्वेमार्गासाठी केंद्राकडून केवळ 20 कोटींची तरतूद
Advertisement

नैर्त्रुत्य रेल्वे विभागासाठी साडेसहा हजार कोटी

Advertisement

बेळगाव : नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नैर्त्रुत्य रेल्वेला 6,493 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम जरी मोठी असली तरी बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या नव्या रेल्वेमार्गासाठी केवळ 20 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. भू-संपादनाचे काम रखडल्याने थोडाच निधी राखीव ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागामध्ये सध्या विकासकामे गतिमान आहेत. नवीन रेल्वेमार्ग निर्माण करण्यासोबतच दुहेरीकरण व विद्युतीकरणही टप्प्याटप्प्याने केले जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात एकूण 1448 कोटी रुपये नवीन रेल्वेमार्गासाठी, 1241 कोटी रुपये दुपदरीकरण तर 961 कोटी रुपये प्रवाशांच्या सोयीसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना राखीव ठेवण्यात आले आहेत. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर हा 72 किलोमीटरचा रेल्वेमार्ग होऊ घातला आहे. राज्य सरकारने अर्धा खर्च तर केंद्र सरकारने अर्धा खर्च करावयास निश्चिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून रेल्वेमार्गासाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, काही शेतकऱ्यांनी सुपीक जमिनींमधून रेल्वेमार्ग जात असल्याने विरोध सुरू केल्याने हा रेल्वेमार्ग मध्यंतरी बारगळला. राज्य सरकार भू-संपादन करत नसल्याचे सांगत केंद्र सरकारनेही राज्य सरकारवरच ताशेरे ओढले आहेत.

बागलकोट-कुडची रेल्वेमार्गासाठी दीडशे कोटी

Advertisement

भू-संपादन रखडल्यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ 20 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. याबरोबरच बागलकोट-कुडची रेल्वेमार्गासाठी दीडशे कोटी देण्यात आले आहेत. तर होस्पेट-तिनईघाट-वास्को या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी 400 कोटींचा निधी मंजूर केल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.