ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे दूध उत्पादकांत विश्वासाहर्ता वाढेल : आमदार डॉ. विनय कोरे
वारणा दूध संघ सलग्न संस्थांचा मेळावा, सभासदांप्रमाणे उत्पादकांना दुग्ध पदार्थ देणार
वारणानगर / प्रतिनिधी
ग्रामीण भाग समृद्ध करणारा सहकार टिकविणे,वाढवणे त्यामध्ये काळानुसार बदल करून नवीन ऑनलाईन कार्यप्रणाली चांगल्या वापर केल्यास दूध उत्पादकांसह प्रत्येक घटकांमध्ये विश्वासाहर्ता निर्माण करून नव- नवी धोरणे अवलंबून सहकार अधिक पारदर्शक व घट्ट करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वारणा दूध संघाचे चेअरमन आ. डॉ. विनय कोरे यांनी केले. Online system वारणानगर येथे झालेल्या श्री. वारणा दूध संघाच्या नोंदणीकृत सहकारी संस्थांचा मेळावा व ऑनलाईन कार्यप्रणाली बाबत दूध संस्था प्रतिनिधींशी संवाद समारंभात डॉ. कोरे बोलत होते.
गुजरातमध्ये "एक गाव एक संस्था असा पॅटर्न आहे या धर्तीवर गावातील संस्था चालकांनी एकत्र येऊन राबविल्यास दूध संस्थांमध्ये कर्मचारी व अन्य खर्च टाळता येईल आणि दूध उत्पादकांना त्याचा लाभ व अधिकाधिक दूध दर देता येईल. बाहेरील संघ दूध मिळविण्यासाठी अमिष दाखवित आहेत यापासून दूध उत्पादकांनी सावध राहिले पाहिजे दूध व्यवसायाच्या वृद्धीसाठी संघाच्या सभासदांच्या बरोबरीने दूध उत्पादकांना दुग्ध पदार्थ देण्याचा मानस आहे.
दूध संस्था व दूध उत्पादक यांना सेवा देणारी फ्रॅंचाईजी देता येईल का ? याचाही विचार सुरू आहे. जी संस्था वारणेचे शंभर टक्के पशुखाद्य घेईल त्यांच्यासाठी वेगळा विचार करण्यात येईल असे डॉ. कोरे यानी सांगितले. संघाच्या पशुधन कवच विमा योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. वारणा समूहातील ऊस व दूध उत्पादकांसाठी स्वतः ची विमा कंपनी स्थापन करण्याचा मानस असल्याचेही डॉ. कोरे यांनी सांगून संस्थांच्या प्रतिनिधींनी दूध संस्थांच्या समोरील समस्या मांडल्या. या समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.
वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दूध संघाचे उपक्रमांची माहिती दिली. संचालक शिवाजीराव मोरे यांनी दूध संस्थांच्या अडचणी स्पष्ट केल्या. निलेवाडी येथील मयूर साफ्टवेअरच्यावतीने ऑनलाईन कार्यप्रणाली माहिती दिली.
यावेळी संचालक शिवाजी कापरे, अभिजित पाटील, अरुण पाटील, माधव गुळवणी , प्रदिप देशमुख, महेंद्र शिंदे, के. आर. पाटील, दीपक पाटील, व्ही.टी. पाटील, राजवर्धन मोहिते, शिवाजी जंगम, चंद्रशेखर बुवा, शोभाताई पाटील, डॉ. मिलिंद हिरवे, मयूर पाटील, लालासाहेब पाटील उपस्थित होते. दूध संकलन व्यवस्थापक अशोक पाटील यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी आभार मानले. शितल बसरे यांनी सूत्रसंचालन केले.