उदगावात जन औषधी केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
उदगाव / वार्ताहर
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजने अंतर्गत येथील उदगाव विकास सेवा संस्थेला मंजूर झालेल्या जन औषधी केंद्राचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी करण्यात आला. याप्रसंगी तालुक्याचे आमदार, माजी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकर मादनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. विकास सेवा संस्था मार्फत सुरू होत असलेल्या जन औषधी केंद्राचा देशामधील दुसऱ्या क्रमांकाचा मान उदगाव सोसायटीला मिळाला आहे.
बुधवारी दुपारी या उद्घाटनाची माहिती मिळताच सोसायटीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी ऑनलाईन उद्घाटन झाल्यानंतर या जनऔषधी केंद्राचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले,केंद्र शासनाची योजना सर्वसामान्यासाठी लाभदायी असून जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा तसेच सोसायटीने देखील सभासद मार्फत सर्वसामान्य पर्यंत ही औषधे पोचण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी बोलताना सावकर मादनाईक यांनी उदगाव सोसायटीस हा सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन करून याचा प्रचार व प्रसार सर्वसामान्य पर्यंत पोहोचवावा तसेच नागरिकांनीही या केंद्राचा लाभ घ्यावा अशी आव्हान केले. संस्थेचे अध्यक्ष विजय कर्वे यावेळी म्हणाले, केंद्र शासनाच्या या योजनेमुळे सर्वसामान्य ग्रामस्थांना गरजूना अगदी स्वस्तामध्ये औषधे उपलब्ध होणार असून सेवाभावी वृत्तीने संस्थेमार्फत जास्तीत जास्त नागरिकांना कसा लाभ होईल या दृष्टीने सदैव प्रयत्नशील राहणार आहे, बाजारमध्ये ब्रँडेड असणाऱ्या औषध कंपन्या पेक्षा 75 ते 95 टक्के स्वस्त औषधे या योजनेअंतर्गत उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी तालुक्याचे सहाय्यक निबंधक अनिल नांद्रे यांनी देखील या योजनेविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राहुल चौगुले, संचालक बाळासाहेब कोळी, एस एन पाटील, राजू कोरे,रमेश कदम, पापा ठोमके, पंकज मगदूम, सौ विमल नेमिनाथ मगदूम, मनु पुजारी एस जे पाटील श्रीकृष्ण माने, राजू मगदूम, श्रीकांत चिवटे, यांच्यासह गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी, संस्थेचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ महिला उपस्थित होते. आभार संस्थेचे सचिव नरसू मगदूम यांनी मानले.