For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑनलाईन फसवणूक, नेपाळी टोळीचा पर्दाफाश

10:17 AM Feb 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑनलाईन फसवणूक  नेपाळी टोळीचा पर्दाफाश
Advertisement

मंगळूर पोलिसांची कारवाई : 11 जणांना अटक

Advertisement

बेंगळूर : मंगळूर शहर सीईएन (सायबर, आर्थिक आणि अमली पदार्थ) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नेपाळमधून चालवल्या जाणाऱ्या व भारतीयांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नेपाळ पोलिसांच्या मदतीने 11 जणांना अटक करण्यात आली आहे. या नेटवर्कमध्ये 16 भारतीय व चिनी नागरिकांचा समावेश आहे. मंगळूर पोलीस आयुक्त सुधीरकुमार रेड्डी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन गुंतवणूक करून फसवणूक करणारी टोळी नेपाळमधून सक्रिय होती. या टोळीतील पाचजण फरार असून त्यांच्या विदेशी साथीदारांबाबत स्वतंत्रपणे तपास सुरू आहे. अटकेतील आरोपी उत्तर भारतातील विविध राज्यांतील आरोपी आहेत. ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक, डिजिटल अरेस्ट आणि इतर सायबर गुन्हे प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

आरोपींकडून एक  लॅपटॉप, 21 मोबाईल, 20 सीमकार्ड तसेच 20 डेबिट व क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलसह इतर डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर 624 बँक खात्यांची माहिती उघडकीस आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त सुधीरकुमार रेड्डी यांनी दिली. मंगळूर सीईएन पोलीस स्थानकात दाखल झालेल्या प्रकरणात तक्रारदाराची 1.38 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. ही रक्कम विविध 10 बँक खात्यांमधून वळविण्यात आली होती. या खात्यांमध्ये सुमारे 30.70 कोटी रुपये ट्रान्स्फर करण्यात आले होते. उर्वरित 623 बँक खात्यांचा तपशील गोळा केला जात आहे. या खात्यांची संबंधित 4,580 हून अधिक तक्रारी राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर नोंदविण्यात आल्या आहेत. एका खात्यातून तब्बल 167 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Advertisement

फसवणूक करणाऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व बनावट टेडिंग अॅपद्वारे भारतीय गुंतवणूकदारांना लक्ष्य करून अधिक परताव्याचे आमिष दाखविले. नेपाळमधून कार्यरत असलेल्या एका गटाने इन्स्टाग्राम व टेलिग्रामवरून खातेधारक व एजंटांची भरती केली. कमिशन व नोकरीचे आमिष दाखवून मिळविलेला पैसा क्रिप्टोकरेन्सीद्वारे विदेशात ट्रान्स्फर करण्यात आले. कंबोडिया व इतर देशांमधून सक्रिय असलेल्या दुसऱ्या गटाने सोशल मीडियाद्वारे गुंतवणूकदारांशी संपर्क साधला तसेच विदेशात काम करणाऱ्या भारतीयांचा वापर करून स्थानिक भाषांमध्ये अधिक परताव्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केले व त्यांच्याकडून विविध खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करून घेतले. या व्यवहारावर नेपाळस्थित टोळी नियंत्रण ठेवत होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. नोकरीच्या बहाण्याने भारतीय तरुणांना सायबर गुन्ह्यांमध्ये अडकविले जात आहे. त्यामुळे डिजिटल शोषणाबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. फसवणुकीसंबंधी तत्काळ 1930 या क्रमांकावर संपर्क साधून नजीकच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.