करविवरणपत्र-2 साठी ऑनलाईन सोय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने करविवरणपत्र-2 (आयटीआर-2) सादर करण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिली आहे. हिंदू एकत्र कुटुंबे आणि व्यक्ती, ज्यांच्यापाशी करपात्र भांडवली उत्पन्न आहे, ते 2024-2025 या वर्षासाठी आता करविवरण पत्र सादर करु शकतात, अशी घोषणाही करण्यात आली आहे. हे विवरणपत्र ऑन लाईन सादर करण्याची सोय आता केंद्र सरकारच्या कर विभागाने केली आहे.
करविवरणपत्र 2 हे हिंदू एकत्र कुटुंब आणि स्वतंत्र व्यक्ती, ज्यांच्याकडे करपात्र भांडवली नफा उत्पन्न आहे, पण ज्यांच्याकडे उद्योग किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न नाही, अशांनी सादर करायचे असते. ते आता ऑनलाईन सादर करता येणार आहे. विवरणपत्र सादर करण्याचा कालावधी 15 सप्टेबरपर्यंत वाढविण्याचाही निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या आठवड्यात कर विभागाने करविवरणपत्र-1 आणि करविवरणपत्र-4 ऑन लाईन सादर करण्याची सोय उपलब्ध करुन दिली होती. आता आयटीआर-2 साठीही हे करण्यात आले आहे.
कर विधेयक अधिवेशनात मांडणार
केंद्र सरकारने गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वतंत्र कर विधेयक संसदेत सादर केले होते. नंतर ते संयुक्त सांसदीय समितीकडे पुढच्या विचारार्थ पाठविण्यात आले होते. या समितीने विधेयकावर सविस्तर विचार करुन त्यात 285 परिवर्तने सुचविली आहेत. हे सुधारित विधेयक 21 जुलैपासून होणाऱ्या संसदेच्या वर्षाकालीन अधिवेशनात संमतीसाठी सादर करण्यात येणार आहे, अशीही माहिती दिली गेली.