दिवाळीसाठी ऑनलाईनचा ‘धुरळा’
कपडे,बुट,इलेक्ट्रॉनिक्सची मोठी मागणी
कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
आज प्रत्येकाच्या हातात एकापेक्षा अधिक स्मार्टंफोन असल्याने, पारंपारिक बाजारपेठेचा लूक बदलून गेला आहे. खाद्यपदार्थ असो कि कपडे असो आता एका क्लिकवर कोणतीही वस्तू घरपोच मिळू लागल्या आहेत. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात ऑनलाईन खरेदीचा धुरळा पडू लागला आहे. विशेषत: कपडे, बुट. सौंदर्यप्रसाधने , इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसह दिवाळी खरेदीसाठी ऑनलाईनला जोर आला आहे.
दिवाळी खरेदी म्हटले की फराळासह इतर वस्तूंची लांबलचक यादी तयार करून, दुकानदाराला दिली जात असे. यानंतर कोल्हापूरात मोठे मॉल्स उभारण्यात आले. यामुळे आपली मनपसंत वस्तू खरेदी होऊ लागली आहे. आता ऑनलाईनचा जमाना असल्याने, यंदाच्या दिवाळीमध्ये ऑनलाईनव्दारे कोटयवधी रूपयाची उलाढाल होणार आहे.
सद्या बाजारपेठेत नामवंत कंपन्यांच्या वस्तूसाठी टाटा क्लिक, रिलायन्स डिजिटल, पेटीएम मॉल, शॉपक्लुज, स्नॅपडिल, मंत्रा, मिशो, जिओमार्ट, निष्कमर्ष या सारख्या ऑनलाईन ,ई-कॉमर्स कंपन्या खास दिवाळीसाठी सज्ज झाल्या आहेत. या दिवाळीसाठी देशातील 65 कोटी ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडणार असून, या काळात अंदाजे 3.5 लाख कोटी रूपयाची उलाढाल होण्याचे संकेत आहेत.
95 टक्के लोकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने, याव्दारे 47 टक्के ग्राहक ऑनलाईनमार्फत खरेदी करू लागले आहेत. यामध्ये युवकासह महीलांचा मोठा समावेश आहे. दिवाळीसाठी शंभर टक्क्यापासून अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये कपडे, बूट,सौंदर्यप्रसाधने,इलेक्ठ्रॉनिक्स वस्तू यांची मागणी वाढली आहे.
ऑनलाइं&न खरेदीसाठी खिशात पैसे असणे गरजेचे नाही. यासाठी डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, अॅपल पे, पेपाल, गुगल वॅलेट सारख्या डिजिटल वॅलेटचा वापर वाढत आहे. गेल्या दोन वर्षात याचा वापर 40 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये 55 टक्के ग्राहक क्यूआर कोडचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्याच बरोबर दिवाळीसाठी लाडकी बहीण योजनेमुळे रोख खरेदी वाढली आहे.