निवडणूक कर्मचाऱ्यांना आता ऑनलाईन भत्ता
राज्य निवडणूक आयोगाचे आदेश : भत्ता वाटप प्रक्रियेत येणार पारदर्शकता
कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता ऑनलाईन भत्ता मिळणार आहे. पुर्वी हा भत्ता मतदान केंद्र अध्यक्षाकडून कर्मचाऱ्यांना रोख स्वरुपात दिला जात होता. या निवडणूकीपासून यामध्ये बदल करण्यात आला आहे. निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेसाठी घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या बॅंक खात्याचा तपशिल घेतला आहे. भत्ता वाटप प्रक्रियेमध्ये सुलभता आणि पारदर्शीपणा येण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून, कर्मचाऱ्यांनाही ते सोयीस्कर होणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी उडाली आहे. प्रचाराच शिगेला पोहोचला असून अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्यक्ष मतदान बुधवार (20 नोव्हेंबर) रोजी होणार आहे, तर मतमोजणी प्रक्रिया शनिवारी (23 नोव्हेंबर) रोजी होणार आहे. कोल्हापूर जिह्यात सुमारे 32 लाख 74 हजार 558 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष 16 लाख 56 हजार 274 व महिला 16 लाख 18 हजार 101 मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे 16 हजार 237 कर्मचारी घेण्यात आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे पहिले व दुसरे प्रशिक्षण निवडणूक विभागाकडून घेण्यात आले आहे. मतदान केंद्रामध्ये 6 कर्मचारी असतात. यामध्ये 1 मतदान केंद्र अध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, 1 शिपाई, 1 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाच्या वतीने भत्ता देण्यात येतो. निवडणूकीचे पहिले व दुसरे प्रशिक्षण, मतदानापुर्वीचा दिवस, प्रत्यक्ष मतदान अशा स्वरुपात हा भत्ता देण्यात येतो.
या निवडणूकीपासून हा भत्ता थेट कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. भत्ता वाटप प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शीपणा येण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. भत्ता वाटप प्रक्रियेतील केंद्र अध्यक्षाचा हस्तक्षेप यामुळे कमी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार या निवडणूकीपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सर्व तपशिल घेतला आहे. याचसोबत या कर्मचाऱ्यांच्या बँकेचा तपशिलही घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्याचे नाव, बँकेचे नाव, आयएफएससी कोड, खाते नंबर असा तपशिल घेण्यात आला आहे. निवडणूक विभागाच्या या ऑनलाईन भत्ता वाटप प्रक्रियेचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे. यामुळे या प्रक्रियेत सुलभता येणार असून, ऑनलाईन व्यवहारास चालना मिळणार आहे.
20 कर्मचारी राखीव
मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाच्या वतीने 16 हजार 237 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष 19 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 20 टक्के कर्मचारी राखीव स्वरुपात ठेवण्यात आले आहेत. राखीव कर्मचाऱ्यांना नेमणूकीचे आदेश देण्यात आले असून, त्यांना मतदानादिवशी त्या त्या विधानसभा मतदार संघाच्या ठिकाणी थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मतदान कर्मचारी संख्या
विधानसभा मतदार संघ : 10
मतदान केंद्र : 3 हजार 452
मतदानासाठी मनुष्यबळ : 16 हजार 237
मतदान केंद्रावरील कर्मचारी व भत्ता
मतदान केंद्र अध्यक्ष : 1 हजार 700
मतदान अधिकारी : 1 हजार 300
मतदान शिपाई : 700
पोलीस : 800
मतदान केंद्रावरील कर्मचारी संख्या
मतदान केंद्र अध्यक्ष : 1
मतदान केंद्र अधिकारी : 3 (मतदान संख्या जास्त असल्यास 4)
शिपाई : 1
पोलीस कर्मचारी : 1