For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कोनशीच्या जंगलात गांजिल माशांचा कहर; ओंकार हत्तीच्या मागावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांवर गांजिल माशांचा हल्ला; दोघे गंभीर जखमी; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

08:11 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोनशीच्या जंगलात गांजिल माशांचा कहर  ओंकार हत्तीच्या मागावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांवर गांजिल माशांचा हल्ला  दोघे गंभीर जखमी  सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
Advertisement
ओटवणे, प्रतिनिधी : बहुचर्चित ओंकार हत्तीच्या मागावर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गांजिल माशांनी हल्ला केल्याची घटना कोनशी गावातील जंगलात घडली. या हल्ल्यात वन विभागाचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओंकार हत्तीवरही गांजिल माशांनी हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ओंकार हत्तीने बुधवारी सायंकाळी ओटवणे गावातून मार्गक्रमण करत रात्री असनिये गाव गाठले होते. दाणोली-बांदा जिल्हा मार्ग ओलांडून भालावल व तांबोळी गावातून तो असनिये येथे दाखल झाला. या परिसरात त्याने रात्रभर मुक्काम केला. गुरुवारी सकाळी पुन्हा मागे फिरत दुपारी कोनशी येथील माऊली मंदिर परिसरात तो दाखल झाला.

Advertisement

त्यानंतर जंगलातून असनियेच्या दिशेने जात असताना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ओंकारचा पाय जमिनीतील गांजिल माशांच्या बिळावर पडला. त्यामुळे हजारो गांजिल माशांनी अचानक हल्ला केला. ओंकारच्या मागोमाग असलेल्या वन कर्मचाऱ्यांनाही या माशांनी लक्ष्य केले. काही क्षणांत हजारो माशा परिसरात पसरल्याने वन कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली.

माशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी जंगलातून धाव घेत सुरक्षित ठिकाण गाठले. या हल्ल्यात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

Advertisement

दरम्यान, वन कर्मचाऱ्यांनी ओंकारचा पुन्हा माग काढण्याचा प्रयत्न केला असता तो जंगलातच थांबून असल्याचे बांदा वनपाल श्री. खोराटे यांनी सांगितले. गांजिल माशांनी ओंकारवरही हल्ला केल्याची शक्यता असून, तो कोनशी-असनिये दरम्यानच्या जंगलात असल्याने त्याचा ठावठिकाणा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

ओंकार हत्तीच्या जंगलातील वास्तव्यामुळे वन विभागाची पथके त्याच्यावर लक्ष ठेवून असून, या घटनेनंतर हत्तीच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.