कांदा पुन्हा 300 रुपयांनी वधारला : कोथिंबीर घसरली
बेळगाव जिल्ह्यामध्ये पावसामुळे भाजीपाल्याची मागणी थंडावली : पावसाळी बटाटा लागवडीसाठी जालंधर बियाणे दाखल
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा पुन्हा प्रति क्विंटल 300 रुपयांनी वधारला. तर पावसाळी बटाटा लागवडीसाठी जालंधर बियाणे मार्केट यार्डमध्ये दाखल होत आहेत. याचा प्रति 50 किलो पिशविला 1400 ते 1500 रुपये प्रमाणे बियाणांच्या बटाट्याची विक्री सुरू आहे. पावसाला प्रारंभ झाल्याने गोवा, कोकण पट्ट्यासह बेळगाव जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याची मागणी थोड्या प्रमाणात थंडावल्याने काही भाजीपाल्यासह कोथिंबीरचा भाव कमी झाला आहे. मात्र, टोमॅटो ट्रे च्या दरात प्रति ट्रे ला 200 रुपयांनी वाढ झाली आहे. इंदोर व आग्रा बटाट्याचा भाव देखील प्रति क्विंटल स्थिर आहे. त्याचप्रमाणे रताळी आणि गुळाचा भाव स्थिर आहे. रब्बी हंगामातील जवारी बटाटा आवक पूर्णपणे संपली आहे. आता पावसाळा संपल्यावरच नवीन बटाटा आवकेला प्रारंभ होणार आहे.
केंद्र सरकारने 1 लाख टन कांदा परदेशामध्ये निर्यात करण्याला परवानगी दिल्याने कांदा साठेबाज व्यापाऱ्यांनी कांदा विक्रीसाठी अद्याप काढला नाही. पावसाळ्यामध्ये दर पुन्हा वाढणार असा अंदाज बांधून साठेबाजी तशीच ठेवली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशभरातील बाजारपेठेवर झाल्याने कांदा दरात वाढ होऊ लागली आहे. देशामधील कांद्याचे मोठे मार्केट महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. संपूर्ण देशाला पुरेल इतका कांदा उत्पादन महाराष्ट्र शेतकरी घेतात. मात्र, दिवसेंदिवस कांद्याच्या आवकेत घट होत चालली आहे. शनिवारी केवळ 30 ट्रक कांदा दाखल झाल्याने कांदा प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढला.
भाजीपाल्याच्या दरात किंचित घट
मागील आठवड्यात कोथिंबीरच्या आवकेत मोठी घट निर्माण झाल्याने कोथिंबीरचा भाव 3500 ते 4000 रुपये शेकडा भाव झाला होता. मात्र सध्या पाऊस झाल्याने आणि कोथिंबीरच्या आवकेत वाढ झाल्याने शेकडा 2500 ते 3000 रुपये भाव झाला आहे. तसेच इतर भाजीपाल्याच्या दरात देखील काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र, टोमॅटो टे चा भाव 200 रुपयांनी वाढला आहे.