कांद्याने गाठला 70-80 चा टप्पा
दरवाढीमुळे सर्वसामान्यांतून नाराजी : व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका : आवक घटल्याचा परिणाम
वार्ताहर/अगसगे
बेळगाव एपीएमसी मार्केट यार्डमध्ये बुधवारच्या बाजारात कर्नाटक कांद्याने क्विंटलला 7000 चा पल्ला पार केला आहे. तर महाराष्ट्र जुन्या कांद्याने प्रतिक्विंटलला 8000 चा पल्ला पार केला आहे. यामुळे कांदा भाव भडकल्याने अक्षरश: महिलांच्या डोळ्यांतून पाणी येणार असून आर्थिक बजेटवर याचा मोठा परिणाम होणार आहे. तर हॉटेल, कॅन्टीन, मेस, खानावळ व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आह. सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच भर म्हणून आता कांद्याचा भावदेखील वधारल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कर्नाटकातील नवीन कांदा मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी येत आहे. तर महाराष्ट्रमध्ये कांद्याची लागवड केली असून डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक येण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये चुकूनच काही प्रमाणात नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. त्याचा भावदेखील भडकला आहे.
कर्नाटकातील नवीन कांद्याची आवक सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मार्केट यार्डमध्ये कमी प्रमाणात विक्रीसाठी दाखल होत आहे. काही परराज्यामध्ये देखील कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे ते व्यापारी बेळगावमधून कांदा आयात करून घेतात. स्थानिक खरेदीदारांसह इतर व्यापारीदेखील कांद्याला मागणी वाढल्याने सवालामध्ये कांद्यासाठी चढाओढ होऊन कर्नाटक कांद्याचा भाव 5500 ते 7000 आणि महाराष्ट्र जुना कांद्याचा भाव 7500 ते 8100 ऊपये प्रतिक्विंटल झाला आहे. यामुळे किरकोळ बाजारात याचा भाव वाढीव दराने विक्री होण्याची शक्यता आहे. येत्या महिन्यात किंवा जानेवारीमध्ये महाराष्ट्रातील नवीन कांद्याची आवक सुरू होणार असून यावेळी भाव कमी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तरी केंद्र सरकारने विदेशामध्ये निर्यात होणाऱ्या कांद्यावर बंदी घालावी, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे
महाराष्ट्र कांद्याची नवीन आवक कमी
सध्या मार्केट यार्डमध्ये काही दुकानांमध्ये चुकूनच लहान आकाराचे कांदे महाराष्ट्रातून विक्रीसाठी येत आहे. सध्या आलेला कांदा आजचा असून त्याचा भावदेखील भडकला आहे. त्यामुळे कांद्याने यावर्षी अक्षरश: सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी आणले आहे.
शेतकऱ्यांतून समाधान
कर्नाटकातील कांद्याच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी वर्ग आनंदी दिसत होता. अतिवृष्टीमुळे सुमारे 60 टक्के कांदा शेतामध्येच कुजून वाया गेला असून 40टक्के कांदा मात्र शेतकऱ्यांच्या पदरात पडला आहे. यामुळे राहिलेल्या उत्पादनाला तरी योग्य भाव मिळाल्याने शेतकरी आनंदी आहे.
हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामान्यांतून नाराजी
जीवनोपयोगी साहित्याच्या इतर गरजू वस्तूंच्या दरात दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होऊ लागली आहे. आणि आता त्यातच भर म्हणून कांद्यानेदेखील किरकोळ बाजारात शंभरी पार केल्याने सर्वसामान्यांसह हॉटेल व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला असून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर हॉटेल्समधून एक्स्ट्रा देण्यात येणारा कांदा जेवणातून गायब होणार आहे. पाहिजे असल्यास जादा पैसे आकारण्याची वेळ ग्राहकांवर येणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामान्यांतून नाराजी पसरली आहे.
कर्नाटक कांदा क्विंटल भाव
- गोळी.............3500 ते 4000
- मिडीयम........5000 ते 5500
- मोठवड.........5500 ते 6200
- गोळा.............6500 ते 7000
महाराष्ट्र जुना कांदा
- मिडीयम.........6000 ते 6500
- मोठवड...........7200 ते 7800
- गोळा..............8000 ते 8100
बटाटा
- इंदोर..............4000 ते 4200
- आग्रा बटाटा....3500 ते 3700
- तळेगाव बटाटा..3700 ते 3800