कांदा अजूनही रडवतोय; पणजीत ६० ते ७० रुपये किलो, फलोत्पादन महामंडळाच्या केंद्रातही कांदा ५८ रु.
पणजी: गणेशोत्सवाच्या काळात भाजीपाल्याच्या खरेदीला वाढलेली मागणी असतानाच कांद्याचे दर मात्र ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणत आहेत. पणजीतील सर्वसाधारण किरकोळ बाजारात कांद्याचा दर सध्या ६० ते ७० रुपये किलो असून, दर्जानुसार काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक दरही आकारला जात आहे. गेल्या आठवड्यात कांद्याचा दर सुमारे ७० रुपयांपर्यंत पोहोचला होता. या आठवड्यातही दर वाढलेलेच आहे. नवीन कांद्याची आवक सुरू असली तरी पुरवठा अद्याप अपेक्षेइतका नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाच्या दरपत्रकानुसार कांदा ५८ रुपये किलो आहे. मात्र, सामान्य बाजारपेठेत हा दर ६० ते ७० रुपयांपर्यंत जात असल्याने ग्राहकांना किरकोळ खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. बटाटा आणि टोमॅटोचे दर सध्या नियंत्रणात असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे. फलोत्पादन महामंडळाच्या दरानुसार भेंडी २८, कोबी २५, गाजर ४७, फूलगोभी २७, चिटकी ५२, वालपापडी ५०, हिरवी मिरची ४७, कांदा ५८, बटाटा २७ आणि टोमॅ टो २३ रुपये किलो आहेत.
पणजीतील सर्वसाधारण किरकोळ बाजारात याच भाज्यांचे दर गुणवत्तेनुसार साधारणपणे भेंडी ६० रु. किलो, कोबी ४०, गाजर ८०, फूलगोभी ४०, वालपापडी ८०, हिरवी मिरची ८०, बटाटा ४० आणि टोमॅटो ४० रुपये किलो इतके दिसून येत आहेत. बाजारातील आवक, दर्जा आणि विक्रेत्यानुसार किरकोळ दरात काही प्रमाणात फरक पडत आहे. कांद्याच्या दरवाढीमागे सध्या नवीन पिकाची मर्यादित आवक हे प्रमुख कारण सांगितले जात आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन कांदा बाजारात येत असला तरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने दरावर त्याचा परिणाम झाला आहे. ताजी आवक वाढल्यानंतर दर काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.