For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांदा दरात 400 रुपयांची वाढ : हासन बटाटा विक्रीसाठी दाखल

06:23 AM Aug 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
कांदा दरात 400 रुपयांची वाढ   हासन बटाटा विक्रीसाठी दाखल
Advertisement

गणेश चतुर्थी सणानिमित्त बुधवारचा बाजार बंद : काही भाजीपाल्यांच्या आवकेत घट निर्माण झाल्याने दरात किंचित वाढ

Advertisement

सुधीर गडकरी / अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात पावसाळी हंगामातील नवीन हासन बटाटा विक्रीसाठी दाखल झाला आहे. त्याचा भाव प्रतिक्विंटल 1800 पासून 3000 रुपये झाला. तर महाराष्ट्र कांद्याचा दर क्विंटलला 400 रुपयांनी वाढला. इंदोर बटाटा, आग्रा बटाटा, पांढरा कांदा भाव स्थिर आहे. कर्नाटक कांद्याचा दरदेखील क्विंटलला 200 रुपयाने वाढला आहे. बेळगाव तालुक्यातील पावसाळी हंगामातील नवीन बटाटा आवक 200 पिशव्या विक्रीसाठी मार्केटला दाखल झाला होता. रताळी, लसूण व गूळ यांचा दर मात्र क्विंटलला स्थिर आहे. भाजीमार्केटमध्ये काही भाजीपाल्यांच्या आवकेत घट निर्माण झाली असून दर किंचित प्रमाणात वाढले आहेत.

Advertisement

शनिवार दि. 23 रोजी मार्केट यार्डमध्ये महाराष्ट्र कांद्याच्या सुमारे 50 ट्रक आवक होती आणि कर्नाटकातून केवळ 5 ट्रक कांदा आला होता. इंदोर बटाट्याच्या 12 ट्रक व आग्रा बटाट्याच्या 5 ट्रक विक्रीसाठी दाखल झाला होता. आणि पांढऱ्या कांद्याच्या केवळ 33 पिशव्यांची आवक झाली होती. गेल्या काही दिवसापासून कांद्याचा दर टिकून होता. मात्र सध्या श्रावण मास संपला आहे. बुधवार दि. 27 रोजी श्री गणेश चतुर्थी असल्याकारणाने गोवा व कोकणपट्ट्यामधून कांद्याला मागणी वाढली आहे. तसेच बेळगाव परिसरात देखील कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कांद्याचा दर क्विंटलला चारशे रुपये आणि वधारला आहे. कारण श्रावण मास संपल्याने मांसाहारी हॉटेल, मेस, धाब्यांमधून कांद्याला मागणी वाढली आहे व परराज्यातून देखील कांद्याला मागणी असल्याने कांदा दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्र कांद्याचा दर क्विंटलला 1500 पासून 2500 रुपये, कर्नाटक कांदा दर 1000 पासून 2000 रुपये, इंदोर बटाटा दर 1800 पासून 2100 रुपये, आग्रा बटाटा भाव 1400 पासून 1600 रुपये, पांढरा कांदा भाव 3500 ते 3800 झाला असल्याची संपूर्ण माहिती व्यापारी महेश कुगजी दिली.

रताळी दर स्थिर

यापूर्वी रताळ्याची केवळ दोनच वेळा उत्पादन घेण्यात येत होते. काही ठराविक वेळेतच रताळ्याचे उत्पादन मार्केट यार्डला विक्रीसाठी येत होते. मात्र सध्या तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये रताळ्याची मोठ्या प्रमाणात लागवड करून वर्षभर रताळी सध्या मार्केट यार्डला विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे आता बारा महिने देखील रताळी मिळतात. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळणारे पीक म्हणून शेतकरी या रताळी लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे बटाटा लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बेळगावच्या रताळ्याला दिल्ली, मुंबई, पुणे, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी मागणी असते. कारण बेळगावची रताळी चवदार असते. खास करून उपवासासाठी व इतर पदार्थ बनवण्यासाठी रताळ्याचा मोठा वापर करतात. त्यामुळे रताळ्याला बारा महिने मागणी असते. शनिवारच्या बाजारात रताळ्याची सुमारे 1500 पिशव्या आवक झाली होती व यांना सध्या महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश, मुंबई आदी ठिकाणी निर्यात होत आहेत व यांचा भाव सर्रास क्विंटलला 1100 पासून 2400 रुपये, उत्तम दर्जाची रताळी 2500 पासून 3100 रुपये भाव शनिवारच्या बाजारात झाला असल्याची माहिती रताळी व्याप्रायाने ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

जवारी बटाटा आवक दाखल

दरवर्षाप्रमाणे गणेश चतुर्थीच्या आठ दिवस अगोदर बेळगाव तालुक्यातील पावसाळी हंगामातील नवीन जवारी बटाटा आवक मार्केट यार्डमध्ये तुरळक प्रमाणात विक्रीसाठी दाखल होत आहे. भुतरामट्टी, वंटमुरी परिसरातील मसार जमिनीतील जवारी बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे, शनिवारी सुमारे 200 पिशव्यांची आवक झाली होती. बेळगाव परिसराचे व गोवा खरेदीदारांनी हा नवीन बटाटा खरेदी केला आहे. त्याचा भाव क्विंटलला 800 पासून 3000 रुपयापर्यंत झाला आहे. आणि गणेश चतुर्थीनंतर तालुक्यामध्ये बटाटा काढणीला जोमात सुरुवात होणार आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्याने दिली.

कांदा दरात चारशे रुपयांनी वाढ

सध्या गेल्या काही दिवसापासून कांदा दरात स्थिरता होती. मात्र आता श्रावण मास संपला आहे आणि गणेश चतुर्थी सण आहे. यामुळे बाजारात उलाढाल वाढली आह.s त्यामुळे कांद्याला देखील परराज्यातून मागणी वाढली आहे. मार्केट यार्डमध्ये आठवड्याच्या शनिवार आणि बुधवार या दोन दिवससामध्ये कांद्याचा लिलाव असतो. मात्र बुधवार दि. 27 रोजी श्री गणेश चतुर्थी असल्याने यावेळी बाजार बंद असणार आहे. त्यामुळे खरेदीदारानी आठवड्याला लागणारा कांद्याचा साठा एकदाच करण्यासाठी कांदा मिळवण्यासाठी सवालामध्ये चढाओढ झाल्याने कांद्याचा दर क्विंटलला चारशे रुपये वाढला आहे, अशी माहिती कांदा अडत व्यापाऱ्याने दिली.

भाज्यांच्या दरात किंचित प्रमाणात वाढ

सध्या गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने भाजीपाल्यांच्या शेतामध्ये पाणी साचून काही प्रमाणात भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळे काही भाजीपाल्यांच्या दरात किंचित प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे टोमॅटो, लिंबू, मेथी आदी पिकांचे थोड्या प्रमाणात नुकसान झाल्याने टोमॅटो, लिंबू यांच्या दरात किंचित प्रमाणात वाढ झाली आहे व सध्या गोव्याला भाजीपाल्याला मागणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भाजीपाला आवकेत घट निर्माण झाली आहे. गाजर इंदूरहून आयात करण्यात येत आहे. तसेच बीन्स नाशिकमधून आयात करण्यात येत आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्याने दिली.

हासन बटाट्याच्या तीन ट्रका दाखल

प्रतिवर्षाप्रमाणे गणेश चतुर्थीच्या आठ दिवस अगोदर हासन बटाटा विक्रीसाठी येतोच. यंदासुद्धा गणेश चतुर्थी अगोदरच यंदाच्या पावसाळी हंगामातील हासन बटाट्याच्या तीन ट्रका मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी दाखल झाला होता. यामधील लाल बटाटा मोठवड भाव क्विंटलला 2500 पासून 3000 पर्यंत झाला व पांढरा बटाटा दर मिडीयम 1800 पासून 2200 व गोळी 500 पासून 1000 रुपये भाव झाला आहे. नवीन हासन बटाटा पाहण्यासाठी खरेदीदारांची दुकानांमध्ये गर्दी झाली होती. गणेश चतुर्थीनंतर हासनहून बेळगाव मार्केट यार्डला आवक वाढणार आहे. हा बटाटा बेळगाव परिसरातील खरेदीदार व गोवा खरेदीदारांनी खरेदी केला आहे. त्याचप्रमाणे श्री गणेश चतुर्थीनंतर बेळगाव तालुक्यातील पावसाळी हंगामातील नवीन बटाटा आवकसुद्धा वाढणार आहे, अशी माहिती लक्ष्मीनारायण ट्रेडर्सचे अडत व्यापारी राजू पाटील यांनी दिली.

Advertisement
Tags :

.