किरकोळ बाजारात कांदा दरात वाढ प्रति किलो 40 ते 60 रुपये
प्रतिनिधी / बेळगाव
किरकोळ बाजारात कांदा दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. प्रति किलो कांदा 50 ते 60 रुपये झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. 30 ते 40 रुपये किलो मिळणारा कांदा 60 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणीला कांद्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. डाळी, कडधान्य आणि खाद्यतेलाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यातच आता कांदा दरही हळूहळू वाढू लागला आहे. टोमॅटो दर स्थीर असला तरी कांदा मात्र वाढत चालला आहे. सण, उत्सवानंतर आता लग्नसराईची धावपळ सुरू झाली आहे. अशातच दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढत चालल्याने वाढत्या महागाईचा चटका सहन करावा लागत आहे.
बाजारात जुन्या कांद्याबरोबर नवीन कांदाही दाखल झाला आहे. मात्र कांद्याचे दर वाढू लागले आहेत. लग्न सराई आणि यात्रा-जत्रांना प्रारंभ होऊ लागला आहे. त्यामुळे कांद्याची मागणीही हळूहळू वाढू लागली आहे. मात्र आवक म्हणावी तशी नसल्याने कांदा वाढताना दिसत आहे.