For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एपीएमसी बाजारात कांदा, बटाटा, रताळी दरात वाढ

06:01 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
एपीएमसी बाजारात कांदा  बटाटा  रताळी दरात वाढ
Advertisement

भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे भाजीपाला दरही भडकले : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात जवारी बटाटा प्रति क्विंटलला 500 रुपयांनी वधारला. तसेच रताळी भाव क्विंटलला 400 रुपयांनी आणि कांदा दर 300 रुपयांनी, इंदोर बटाटा 100 रुपयांनी वाढले आहेत. त्याप्रमाणे भाजीमार्केटमध्ये देखील भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे दर भडकले आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये भाजीपाल्यांचे तसेच रताळी, जवारी बटाटा यांच्या दरात भरीव वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळांप्रमाणे आता दैनंदिन वापरातील भाजीपाला दरात देखील वाढ झाल्याने महागाईची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे. यामुळे गोरगरीब नागरिकांच्या भाकरीवरची भाजी गायब होत आहे.

Advertisement

मार्केट यार्डमध्ये बेळगाव तालुक्यातील जवारी बटाटा आवक आणि रताळ्याची आवक येत आहे. इंदोर आग्रा या परराज्यातून बटाटा विक्रीसाठी येत आहे. महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून कांदा विक्रीसाठी येत आहे. गूळ तालुक्याच्या पूर्व भागातून येत आहे. मार्केट यार्डमध्ये आठवड्यातून दोन वेळा म्हणजे शनिवार आणि बुधवार या दोन दिवशी कांदा, बटाटा, रताळी या मालाचा सवाल होतो. इतर दिवशी हातावर व्यवहार करून माल विकला जातो. तर भाजीमार्केटमध्ये दररोज सकाळी भाजीमार्केटला सुरुवात होते आणि दुपारी व्यवहार कमी होतात. दर सोमवारी भाजीमार्केटमध्ये व्यवहार बंद केला जातो. मात्र सध्या गेल्या 15 दिवसांपासून अधून-मधून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतामधील भाजीपाला खराब होत आहे. पाण्याअभावी यंदा भाजीपाला उत्पादनात मोठी घट निर्माण झाल्याने दर वाढत आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.