टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी वर्षाची मुदतवाढ
सर्वोच्च न्यायालयाचा लाखो शिक्षकांना दिलासा : टीईटी उत्तीर्ण होण्याची अंतिम मुदत वाढवली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील लाखो शिक्षकांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याची अंतिम मुदत एका वर्षाने वाढवली आहे. कार्यरत शिक्षकांना आता टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदत निर्धारित करण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2027 पर्यंत होती. वर्षाची मुदत वाढवल्यामुळे शिक्षकांना वाढीव वेळ मिळणार आहे.
2009 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीच्या आवश्यकतेतून सूट देण्याची मागणी करणाऱ्या पुनर्विलोकन याचिकांवर सुनावणी सुरू असताना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, सर्व कार्यरत शिक्षकांनी विहित मुदतीत टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी पुन्हा फेटाळून लावली. जर शिक्षकांच्या सेवेची पाच वर्षांपेक्षा जास्त मुदत शिल्लक असेल तर टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्या शिक्षकांची सेवेची पाच वर्षांपेक्षा जास्त मुदत शिल्लक आहे, त्यांना टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. जर सदर शिक्षक विहित वेळेत परीक्षा उत्तीर्ण होण्यात अयशस्वी झाले तर त्यांना नोकरी सोडावी लागू शकते किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीला सामोरे जावे लागू शकते. तथापि, पाच वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या शिक्षकांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे. सदर शिक्षकांना त्यांच्या नोकरीत कायम राहण्याची परवानगी दिली जाईल, परंतु पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
शिक्षक भरतीसाठी टीईटी आवश्यक
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक भरती आणि पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य असल्याचे घोषित केले होते. शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक पात्रता चाचणी आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. टीईटी ही देशभरातील सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये शिक्षक बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होणे हे शिक्षक भरतीसाठी आवश्यक पात्रता मानली जाते.