बाप्पांची उपासना करणाऱ्याला मोक्ष प्राप्त होतो
अध्याय सातवा
बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे, पूजेच्या सुरवातीला पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आपलं शरीर स्नान करून शुद्ध करावं. नंतर प्राणायाम करून चित्त स्थिर करावे. त्यानंतर न्यास करावेत. आपलं हे शरीर खरं म्हणजे ईश्वराच्या मालकीचं आहे आणि त्यानं ते आपल्याला आपल्या आत्म्याचा आपण उध्दार करून घ्यावा या कामासाठी वापरायला दिलेलं आहे पण आपण हा देह आपला समजतो. देहाच्या संबंधाने आप्त, स्वजन, धनदौलत, अन्य सुखोपभोग या सर्वाविषयी आपण ममत्वभाव बाळगतो पण हे चुकीचे असून अनर्थकारी आहे. हा देह ईश्वराच्या मालकीचा आहे याची जाणीव व्हावी म्हणून शास्त्रात विविध न्यासक्रिया सांगितल्या आहेत. त्यामुळे देह पवित्र होऊन त्याला पूजा करायचा अधिकार मिळतो. तसेच पूजा करत असताना मन अस्थिर होणे, ग्लानी किंवा सुस्ती येणे, भ्रम उत्पन्न होणे हे सर्व टाळण्यासाठी अशा न्यासांची आवश्यकता असते. त्यामुळे जप, नामस्मरण किंवा कोणतेही कार्य करायची ताकद शरीरात निर्माण होते. ज्यांना शक्य आहे त्यांनी यातील जाणकार लोकांच्याकडून विविध न्यास शिकून घ्यावेत व देहशुद्धी करून पूजाविधी करावा.
अर्थात सगळ्यांना ह्या पद्धतीने शास्त्राsक्त पद्धतीने न्यास करून पूजाविधी करणे शक्य होईलच असे नाही
त्यांना श्रीनाथमहाराजांच्या पुढील अभंगातून दिलासा मिळतो. देह शुद्ध करुनी भजनी भजावे...आणिकांचे नाठवावे दोष-गुण? साधने समाधी नको बा उपाधी ... सर्व समबुद्धी करी मन? म्हणे जनार्दन घेई अनुताप ...सांडी बा संकल्प एकनाथा ।। नाथमहाराज म्हणतात, देहशुद्ध करून इतरांचे गुणदोष आठवत न बसता भजन करावे. त्यासाठी इतर साधनांची वा समाधी साधण्याची गरज नाही. कुणाकडून काही अपेक्षा न बाळगता सर्वांच्याबद्दल समबुद्धि असली की झालं. इथं समबुद्धि म्हणजे ज्याच्या बाबतीत जे जे करणं आवश्यक आहे ते ते सर्व निरपेक्षपणे करणं. पूजा करताना अमुक एक गोष्ट आपल्यापाशी नाही ह्याचा खेद वाटून न घेता, ईश्वर कर्ता आहे हे लक्षात घे आणि कोणताही संकल्प करू नकोस. आयुष्यात जे काही घडेल ते ईश्वरी इच्छेनुसार घडेल आणि ते आपल्या भल्याचंच असेल अशी पक्की खुणगाठ मनाशी बांधून ठेव म्हणजे भजन करताना तुझी एकतानता होईल असं माझे स्वामी जनार्दनस्वामी सांगतात.
पुढील पूजाविधीचे वर्णन करताना बाप्पा म्हणतात,
स्थिरचित्तो जपेन्मत्रं यथा गुरुमुखागतम् ।
जपं निवेद्य देवाय स्तुत्वा स्तोत्रैरनेकधा ।।16।।
अर्थ- गुरुमुखाने प्राप्त झालेला मंत्र स्थिरचित्त होऊन जपावा. जप केल्यावर तो देवाला अर्पण करून स्तोत्रांनी अनेक प्रकारे त्याची स्तुती करावी.
सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात, सद्गुरुंनी दिलेला मंत्र आणि आपल्या आवडीनुसार केलेल्या मंत्राचा जप ह्यात तसा फरक नसतो. परंतु सद्गुरुंनी दिलेल्या मंत्राचं महत्त्व असं की, ते त्यापाठी उभे असतात आणि साधकाकडून ते त्या मंत्राचा जप करून घेतात. केलेला जप देवाला अर्पण केला की, त्यातून निर्माण होणारे पुण्य साधकाच्या खात्यावर जमा होत नाही व ते भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्माला यावे लागत नाही.
एवं मां य उपासीत स लभेन्मोक्षमव्ययम् ।
उपासनया हीनो धिङ्नरो व्यर्थजन्मभाक् ।।17।।
अर्थ- याप्रकारे जो माझी उपासना करतो त्याला शाश्वत मोक्ष प्राप्त होतो. जो असे करणार नाही त्याचा धिक्कार असो. त्याचा जन्म वाया गेला असे समजावे. मनुष्य योनीत जन्म मिळाल्यावर जो मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही व देहसुखाचाच कायम विचार करतो त्यानं मनुष्यजन्म वाया घालवल्यासारखंच आहे.