For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरपेक्ष वृत्तीने कर्मे करणारा ईश्वराला प्रिय होतो

06:40 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
निरपेक्ष वृत्तीने कर्मे करणारा ईश्वराला प्रिय होतो
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, तात्पुरत्या आनंदाची ज्ञानी माणसाला अपूर्वाई वाटत नसते. त्यामुळे त्याला बाह्य वस्तुंचं आकर्षण नसतं. त्या वस्तू असतील तर ठीक व नसल्या तरी चालतील अशी त्याची मनोवृत्ती असते. कसलाही मोह वाटत नसल्याने त्याला त्याच्या आत्मस्वरुपाची आठवण कायम असते व तो त्यात रममाण होऊन राहतो. अशा माणसाला जीवनात आणखीन काही मिळवायचं असं राहिलेलंच नसतं. कर्मयोगाचे आचरण करून त्याला शाश्वत अशा ब्रह्मपदाची प्राप्ती होणार आहे. निरर्थक असलेल्या गोष्टीत रस न वाटणे साहजिकच आहे. तो केलेलं कर्म तर ईश्वराला अर्पण करतोच व त्याचबरोबर त्या कर्माच्या फळाचाही त्याग करतो. इच्छेनुसार जेव्हढे कर्म त्याच्या हातून होणार असते तेव्हढे झाले की तो समाधानी राहतो. संन्यास म्हणायचा तो हाच.

थोडक्यात, कर्मयोगाचे आचरण करत करत मनुष्य संन्यासी कधी होतो हे त्याचे त्यालासुद्धा कळत नाही. कोणत्याही फळाची अपेक्षा नसलेला माणूस आपोआपच निर्विकार होतो. सुखदु:ख, राग आणि द्वेष हे विकार सामान्य माणसाला छळत असतात. माणसाला निरनिराळ्या इच्छा होत असतात किंवा केलेल्या कर्मातून त्याला काही अपेक्षा असतात. त्याच्या मनासारखे झाले की, तो सुखी होतो जर झाले नाही तर दु:खी होतो. जे त्यांची इच्छापूर्ती होण्याच्या आड येतात त्यांचा त्याला राग येतो किंवा ज्यांना त्यांना हवं ते मिळाले असेल त्यांचा तो द्वेष करू लागतो पण ज्याला सुखदु:ख, राग आणि द्वेष असे विकार नसतात त्याला अविकारी म्हणतात. त्याला षड्रिपु बाधू शकत नाहीत. अशाप्रकारे संपूर्ण चित्तशुद्धी झालेला साधक शेवटी मला येऊन मिळतो असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

Advertisement

अतो सक्ततया भूप कर्तव्यं कर्म जन्तुभि ।

सक्तो गतिमवाप्नोति मामवाप्नोति तादृश ।। 19।।

अर्थ-म्हणून हे राजा, प्राण्यांनी आसक्तिरहित कर्म केले पाहिजे कारण आसक्तियुक्त मनुष्य अधोगतीला जातो. मी सांगितल्याप्रमाणे आचरण करणारा म्हणजे आसक्तिरहित कर्म करणारा मजप्रत येतो.

विवरण-सामान्य मनुष्य प्रपंचात रममाण झालेला असतो त्याला तो किती करू आणि किती नको असे झालेले असते. लौकिक गोष्टी मिळवण्यात त्याला धन्यता वाटत असते. त्यातून त्याला अधिक काही मिळावे असंही वाटत असते. त्यालाच आसक्ती असे म्हणतात. त्यातून त्याचे विकार बळावतात. माणसाचे मन नेहमीच अधिकाची अपेक्षा करत असते. त्यामुळे कर्मे करतानाही त्यातून जास्तीतजास्त फळ, लवकरात लवकर कसे मिळेल या अपेक्षांच्या दबावाखाली कर्मे केली जातात. मला हवं तसंच घडलं पाहिजे ही प्रबळ इच्छा असते. त्यासाठी इष्ट अनिष्ट सर्व प्रकारचे मार्ग चोखाळले जातात. त्यातूनच पापाचरण घडतं. स्वार्थ साधण्यासाठी मनुष्य कोणत्याही टोकाला जाऊ शकतो.

परिणामी मनुष्य अधोगती पावतो. त्याला पुढला जन्म नीच योनीत मिळतो परंतु ज्याला ब्रह्म सत्य, जग मिथ्या असे वाटत असते त्याला विकार त्रास देत नाहीत. असा अविकारी मनुष्य असक्तीरहित कर्म करत असतो. तो केलेल्या कर्माच्या यशापयशामुळे आनंदित किंवा दु:खी होत नाही. निरपेक्ष वृत्तीने कर्मे करणारा ईश्वराला प्रिय होतो व अंतिमत: त्याला जाऊन मिळतो. असं हे अगदी साधं सुधं तत्वज्ञान आहे पण माणसाला असं आयुष्य आवडत नाही. कारण त्याला अधिकाची हाव असते, मोह असतो. कालांतराने तो लोभात बदलतो आणि मनुष्य स्वार्थाच्या दलदलीत रुतत जातो. म्हणून मनुष्याने निरपेक्षतेनं कर्म करायला सुरुवात केली पाहिजे. प्रथम आपण अपेक्षा न ठेवता कर्मे करायची आहेत हे लक्षात ठेवावं लागेल पण पुढे पुढे त्याची सवय होऊन तो त्याचा स्वभाव बनेल. ईश्वराला अशी माणसं फार आवडतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.