For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गीतेचा अभ्यास आणि अनुकरण करणाऱ्याचा उद्धार होतो

06:17 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
गीतेचा अभ्यास आणि अनुकरण करणाऱ्याचा उद्धार होतो

अध्याय एकतिसावा

Advertisement

श्रीकृष्णाचे निजधामाला गमन झाल्यावर उद्भवलेल्या परिस्थितीचे वर्णन शुकमुनी परिक्षिताला सांगत होते. त्याचे नाथमहाराज सविस्तर विवरण करत आहेत. ते म्हणाले, जेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णाचे निधन झाल्याचे समजले तेव्हा त्याच्या असे मनात आले की, मी नर, तो नारायण असे वेगवेगळे दिसत असलो तरी मी अर्जुन स्वत:ला परिपूर्ण समजतो. श्रीकृष्णाचे माझ्यावर किती उपकार आहेत त्याला काही सीमा नाही. बाप कृपाळु कृपानिधी असलेल्या श्रीकृष्णाने भारतीय युद्धाच्यावेळी मला उपदेश करून माझी जी समाधी लावली ती कोणत्याही परिस्थितीत कल्पांतापर्यंत उतरणार नाही. त्यांनी मला जी ब्राह्मीस्थिती प्राप्त करून दिली त्याला तोड नाही. ती एकदा प्राप्त झाली की, कायम टिकून राहते असे त्यांनीच सांगितले आहे. त्याचा प्रत्यय मला युद्धाच्याप्रसंगी पुरेपूर आला. रणवाद्ये वाजत होती, रथांचे खडखडात चालू होते, शस्त्रांचे कडकडाट होत होते, त्याही वातावरणात माझी परमार्थनिष्ठा यत्किंचितही ढळली नाही.

ज्याला श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश केला तो त्याच्या अंगात बाणला गेला नाही असे होणारच नाही. माझ्यावर गीतेच्या उपदेशाचा काहीच परिणाम झाला नाही असे म्हणणाऱ्याची वाचाच अत्यंत दुषित असली पाहिजे. अशी वाचा दुर्धर कुष्टरोग होऊन झडेल, ती नाना कल्पना लढवणारी होईल किंवा कृष्णाचे सांगणे माझ्या मनावर ठसलेच नाही असे म्हणणारी वाचा समूळ उखडण्याच्या योग्यतेची होईल. गीता उपदेश परिपूर्ण नाही असे जर वाग्देवता असलेली सरस्वती म्हणू लागली तर तीसुद्धा थरथर कापू लागेल. मग इतरांची काय कथा? जो गीता ऐकेल, वाचेल, पठण करेल त्याला गीतेचे वारंवार स्मरण घडेल. अशा व्यक्तीला आपोआपच परिपूर्णत्व येईल. गीतार्थाचे परिपूर्णत्व सांगणारे श्रीकृष्ण आणि ऐकणारा अर्जुन ह्या दोघांनीही जाणले होते. वेदार्थाचा सारांश काढून श्रीकृष्णांनी गीता सांगितली. ते लक्षात घेता ती निश्चितच ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला आणि नित्य पठण करणाऱ्याला मोक्ष मिळवून देते ह्यात संशय नाही. आत्तापर्यंत वेदान्त सगळ्यांना समजण्यासारखा नव्हता परंतु आता गीतेच्या अभ्यासाने, मननाने तो सर्वांना सहजी समजण्यासारखा झाला आहे. जो असा अभ्यास करून त्याचे मनन करेल तो मोक्ष मिळवण्याचा अधिकारी होईल.

Advertisement

वेद हे श्रीकृष्णनाथाच्या निश्वासातून जन्मलेले आहेत तर गीतार्थ हा प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकट झाला आहे. म्हणून गीतार्थाचे महत्त्व अगाध आहे. गीतेमुळे वेद समजणे सहजसोपे झाले. वेदपठण करणे फार थोड्या लोकांना शक्य होते. हे वेदांचे वैगुण्यच म्हणायचे. जणू काही हे दूर करण्यासाठी श्रीकृष्णांनी गीता सांगितली हेच खरे. त्या गीतेचे वाचन, श्रवण करून जो ती नित्य पठणात ठेवेल त्याचा निश्चितच उद्धार होईल.

Advertisement

खरं तर अर्जुनावर श्रीकृष्णाचे आत्यंतिक प्रेम असल्याने त्याला त्यांनी गीता सांगितली पण त्यातून त्यांनी जगातील समस्त लोकांवर उपकार केले आहेत कारण तिच्या अभ्यासातून, श्रवण, पठणातून अनेकांचा उद्धार झाला आहे. जीवनात कोणकोणते प्रसंग येणार हे माणसाच्या पूर्वकृत्यानुसार तयार झालेल्या प्रारब्धातून ठरते आणि ते प्रसंग, त्यानुसार भेटणाऱ्या व्यक्ती आणि वाट्याला येणारी परिस्थिती कोणीही टाळू शकत नाही परंतु त्या त्या प्रसंगी आपण कसे वागायचे हे गीता शिकवते. त्यानुसार गीता ऐकणारा, पठण करणारा वागत गेला तर त्याचा निश्चितच उद्धार होतो असे गीता सांगते. थोडक्यात आपला उद्धार आपणच करून घ्यायचा आहे हे गीतेच्या अभ्यासातून लक्षात येते. असे हे अगाध गीतामहिमान आठवून अर्जुन स्वत:चे सांत्वन करून घेत होता. त्यामुळे त्याचे दु:ख काहीसे हलके झाले आणि तो स्वस्थ झाला.

क्रमश:

Advertisement
Tags :
×

.