For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वधर्माचे आचरण करणारा मोठा अधिकारी होतो

06:28 AM Dec 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वधर्माचे आचरण करणारा मोठा अधिकारी होतो
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

सृष्टी निर्मितीचे कार्य परमेश्वराने ब्रह्मदेवाकडे दिलेले होते. त्यांनी प्रजेचे आणि तिचे नित्य आचरण कसे असावे हे सांगणाऱ्या धर्माची निर्मिती एकदमच केली. त्यावेळी ते लोकांना म्हणाले, प्रत्येकाला मी त्याच्या कुवतीनुसार योग्य ती कामे दिलेली आहेत. ती तुम्ही निरपेक्षपणे केलीत तर तुम्ही स्वधर्म निभावल्यासारखे होईल. तसे केलेत तर त्या व्यतिरिक्त इतर पूजा अर्चा, धार्मिक गोष्टी करायची तुम्हाला काहीच आवश्यकता नाही. अशा प्रकारे जर, तुम्ही स्वधर्माचे आचरण कराल, तर कामधेनुप्रमाणे तो तुमच्या इच्छा पुरवेल. म्हणून स्वधर्माचे आचरण करत रहा. थोडक्यात ब्रह्मदेवांनी असे संगितले आहे की, माणसाने त्याच्या कुवतीनुसार त्याला देवाने दिलेलं काम निरपेक्षतेने करणे हेच त्याच्या जीवनाचे इतिकर्तव्य आहे. ह्यात कुठंही स्वत:चं डोकं चालवायला वाव नाही पण मनुष्य त्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या डोक्याने काहीतरी करत बसतो त्यातून फळाची अपेक्षा करतो आणि कर्मबंधनात अडकतो.

गीतेत जिथे जिथे धर्म शब्द आलेला आहे तेथे त्याचा अर्थ कर्तव्य असा घ्यावा. नेमून दिलेले कर्म कर्मेंद्रियांनी करणे हे धर्माचरण होय. जो माणूस आपल्या कर्तव्याला चुकतो तो देहाच्या अधीन झाल्याने पापकर्मे करत राहतो. जो निरपेक्षतेने कर्म करतो तो पाप-पुण्याचा भागीदार होत नसल्याने कर्मबंधनापासून आपोआप मुक्त होतो. त्यामुळे त्याला जिवंतपणी मोक्ष मिळाल्याची प्रचिती येते. म्हणून भगवंत म्हणाले, हे अर्जुना, तू स्वधर्माचे आचरण कर. कर्तेपणाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण बुध्दीने कर्म कर. ह्या अर्थाचा

Advertisement

पूर्वी प्रजेसवे ब्रम्हा यज्ञ निर्मूनि बोलिला । पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा काम-धेनु चि ।। 10।।

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार ब्रह्मदेव म्हणाले, जो स्वधर्माचे आचरण करतो, त्याला काहीसुद्धा बंधनकारक होत नाही. मी तुम्हाला दिलेले काम तुम्ही निरपेक्षपणे पार पाडले तर स्वधर्म निभावल्यासारखे होईल आणि तो तुम्हाला कामधेनुप्रमाणे हवे असेल ते देईल. इथे एक मेख अशी आहे की, जो स्वधर्माचे पालन करेल तो प्रत्येक काम निरपेक्षतेने करत असल्याने कुणाकडून कसलीही अपेक्षा करण्याची त्याला इच्छाच होणार नाही. निरपेक्षतेने काम करण्याची सवय एकदा त्याच्या अंगवळणी पडली की, त्याचा आहे त्यात समाधानी राहण्याचा स्वभाव होईल. ह्या दुर्मीळ अशा समाधानाची प्राप्ती होणे म्हणजेच कामधेनुने पाहिजे असलेले सर्व काही दिल्यासारखेच आहे.

पुढील श्लोकात भगवंत सांगतात, स्वधर्मरूप यज्ञाच्या आचरणाने तुम्ही देवांचे पूजन केले असता देव तुमच्यावर प्रसन्न होतील, याप्रमाणे तुम्ही परस्परांना संतुष्ट करून आपले कल्याण करून घ्या.

रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देव ते । एकमेकास रक्षूनि पावा कल्याण सर्व हि ।। 11 ।।

माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, ब्रह्मदेव पुढे म्हणाले, या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवतांना संतोष होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छित भोग देतील. असे एकमेकांचे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल, तेंव्हा तुम्ही जे करू म्हणाल, ते सहजच सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होईल. तुम्हीच आज्ञा करणारे व्हाल. महासिद्धी प्राप्त झालेले ऋषीमुनी आपणहून तुम्हाला काय हवे असे विचारतील.

क्रमश:

Advertisement
Tags :

.