जो योगाच्या आठही अंगाचा अभ्यास करतो तो योगाभ्यासी असतो
अध्याय पाचवा
सर्वत्र समदृष्टी बाळगणारा कर्मयोगी मान, अपमान ह्या दोन्हीही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सोने, माती ह्या गोष्टी त्याला सारख्याच निरर्थक वाटत असतात. योगसाधनेला त्यांची मन:स्थिती अनुकूल झालेली असते मात्र त्याने तो दमलेला असताना, त्याला भूक लागलेली असताना, आजारी असताना तसेच प्रतिकूल वातावरणात, योगसाधना करू नये. जेथे शासन व्यवस्था उत्तम आहे, धार्मिक सलोखा चांगला आहे, जेथे दगड, आग आणि पाणी ह्यापासून उपद्रव होण्याचा धोका नाही अशा एकांत स्थानी मठ बांधून साधकाने योगसाधना करावी. जेथे गोंगाट होत असेल तेथे मनाची एकाग्रता साधने कठीण जाते. म्हणून तेथे साधना करू नये. जो दोषयुक्त ठिकाणी योगाभ्यास करेल त्याला तत्काळ स्मृतिलोप, मूकत्व, बधिरता, मन्दता, ताप आणि जडता ही उत्पन्न होतात. नर्मदाकाठ योगसाधनेसाठी आदर्श मानला जातो. कित्येक योग्यांनी नर्मदा काठावर योगसाधनेला सुरवात करून साधनेची सांगता गंगाकिनारी केलेली आहे.
पुढील श्लोकात बाप्पा सांगत आहेत की, जो योगाच्या आठही अंगाचा अभ्यास करतो तो योगाभ्यासी असतो. जो योगाभ्यासात शेवटपर्यंत जातो त्याला योगाभ्यासशालिनी असे म्हणतात.
एते दोषाऽ परित्याज्या योगाभ्यसनशालिना । अनादरे हि चैतेषां स्मृतिलोपादयो ध्रुवम् ।। 11 ।।
अर्थ- योगाभ्यासशाली मनुष्याने या दोषांचा त्याग करावा. यांकडे लक्ष न दिल्यास स्मृतिलोपादि फल खात्रीने प्राप्त होते.
विवरण- ज्याने योगाच्या अभ्यासाला सुरवात केलेली आहे त्याला योगी म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाभ्यासाचे आठ भाग किंवा अंगे आहेत.
योगशास्त्र हे मुख्यत: प्रायोगिक शास्त्र असल्यामुळे अधिक महत्त्व प्रयोगाला किंवा साधनेला आहे. म्हणूनच महामुनी पतंजलींनी योगदर्शनामध्ये चित्तवृत्तींच्या निरोधाचे उपाय, क्रियायोग, साधनेच्या मार्गात येणारे अडथळे आणि ते दूर करण्यासाठी ध्यानादी प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजेच योगाची आठ अंगे किंवा अष्टांग योग होय. ही आठ अंगे मुख्यत्वे दोन विभागांत आहेत. बहिरंग योग-ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम येतात आणि अंतरंग योग-ज्यात धारणा, ध्यान, समाधी येतात. पाचवे अंग म्हणजे प्रत्याहार जे बहिरंग योगाला अंतरंग योगाला जोडणारा सेतू आहे. माणसाचे स्थूल शरीर व सूक्ष्म मन यांचा अत्यंत घनिष्ट संबंध आहे. म्हणूनच त्यांचा एकत्रितपणे विचार करून शरीरसंवर्धनासाठी आणि मनशुद्धीसाठी, मनोकायिक आरोग्य लाभावे म्हणून ही यम, नियम आदी साधने सांगितली आहेत. ही अंगे मानवी अस्तित्वाच्या बाह्यांगाचा प्रामुख्याने विचार करतात, म्हणून त्यांना बहिरंग योग म्हणतात. लयबद्ध श्वसनाला योगामध्ये अतिशय महत्त्व आहे. प्राणायाम हे योगोपचारातले एक प्रमुख साधन आहे. प्राणायामच्या अचूक व नियमित सरावामुळे फुफ्फुसांची श्वसनक्षमता वाढते आणि म्हणूनच साधकाचे आयुष्य वाढते. साधकाला निरोगी शरीर, स्थिर व प्रसन्न चित्त, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचूक निर्णयक्षमता प्राप्त होते. प्रत्याहार म्हणजे मन आणि इंद्रिये यांच्यावर ताबा मिळवण्याची शिस्त. प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे इंद्रियांना शांत ठेवणे शक्य होते. तर एखाद्या बिंदूवर, विषयावर एकाग्रता साधण्याची कला म्हणजे धारणा. यामुळे आंतरिक जागरूकता निर्माण होते व मनात सतत उद्भवणाऱ्या विचारांचे संकलन होऊन मानसिक ताणतणाव दूर होतात. धारणा दीर्घकाळ टिकून राहिली की मगच ध्यान लागते. साधकाच्या संपूर्ण मनोकायिक रचनेमध्ये सुयोग्य बदल घडवून आणण्याची शक्ती असते. म्हणूनच ध्यानाला अतिशय महत्त्व आहे. कोणत्याही तऱ्हेचा व्यत्यय न येता दीर्घकाळ ध्यान लागले की समाधी लागते.
क्रमश: