For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्मयोगात मुरलेल्या माणसाला कर्मफळाचे आकर्षण वाटत नाही

06:03 AM Mar 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्मयोगात मुरलेल्या माणसाला कर्मफळाचे आकर्षण वाटत नाही
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

भगवंत म्हणाले, कर्मयोग आणि कर्मत्याग ह्या दोन्हीही गोष्टी मोक्ष मिळवून देतात परंतु कर्मयोग सर्वांना सुलभ असल्याने त्याचे अनुकरण करावे. कर्मयोगाचे आचरण करत करत तो त्यात मुरला की, त्याला त्यातून मिळणाऱ्या नाशवंत फळाचे आकर्षण रहात नाही. ते मिळाले काय आणि नाही काय त्याला सारखेच असते. फळाचे आकर्षण संपल्याने तो कुणाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करत नाही. त्यामुळे तो कर्मयोगी नित्य संन्यासीच असतो. त्याला विकार छळत नसल्याने तो कायम टिकणाऱ्या सुखाचा धनी होतो. तो नित्य तृप्त असतो. समोर दिसणाऱ्या गोष्टी नाशवंत असल्याने त्यांचे असणे हा केवळ भास आहे हे ओळखलेले असते. त्यातील निरर्थकता तो जाणून असतो. त्यामुळे त्याला अमुक एक हवं, तमुक नको असं कधी वाटत नाही. जर समोरच्या वस्तुत मन गुंतलं नसेल ना तर ती वस्तू समोर असली म्हणून बिघडत नाही. संन्याशाला संसारातील वस्तूंचे आकर्षण वाटत नाही. तो कशातच गुंतलेला नसल्याने तो नि:संग भावनेने घरात राहू शकतो. ज्यावेळी मी आणि माझे ही कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. अशा परिस्थितीत कर्मयोगी आणि कर्मसंन्यासी ह्या दोघांची मन:स्थिती सारखीच असते. या कारणाने कर्मसंन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत असे मी म्हणतो.

मागील अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोगाचे आचरण करायला सांगितले होते पण ते करणे सुलभ जाण्यासाठी आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कर असेही सांगितले होते पण ह्यातील एकसारखेपणा जो लक्षात घेत नाही त्याला कर्मयोग आणि आत्मज्ञान मिळवून देणारा सांख्ययोग हे वेगवेगळे आहेत असे वाटत असते. त्याबद्दल पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, सांख्य व कर्मयोग भिन्न फल देणारे आहेत असे अज्ञ बोलतात. यापैकी एकाचे जरी अनुष्ठन केले तरी मोक्ष प्राप्त होतो.

Advertisement

म्हणती सांख्य-योगाते भिन्न मूढ न जाणते । बाणो एक हि ती निष्ठा दोहींचे फळ देतसे ।।4।। सांख्यास जे मिळे स्थान ते योग्यास हि लाभते । एक-रूप चि हे दोन्ही जो पाहे तो चि पाहतो ।।5।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत त्यांना सांख्ययोग व कर्मयोग यातील फरक माहीत नसतो. म्हणून या दोन मार्गांना ते भिन्न समजतात. वस्तुस्थिती तशी नाही. प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगवेगळा असतो का? ज्याने एकाच मार्गाचे चांगले आचरण करून संपूर्ण तत्व समजावून घेतले त्याला दोन्ही मार्गाचे स्वरूप एकच आहे हे लक्षात येते. सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते. सांख्य व कर्मयोग हे एक आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय. या दोन मार्गात सहजच एकता आहे. कर्मयोग व सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते त्यालाच ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले असे म्हणता येईल.

आत्मज्ञान झालेला माणूस कर्मसंन्यासी असतो पण हे लक्षात न घेता, अचानक एखादा मनुष्य कर्म करण्याचा कंटाळा येऊन किंवा कर्म करण्याचे टाळण्यासाठी मी आता संसार त्याग करून, संन्यास घेऊन वनात जाऊन राहतो असे म्हणू लागला तरी त्याला ते साध्य होत नाही कारण कर्मयोग अंगात भिनल्याशिवाय मनुष्य कर्मसंन्यासी होऊ शकत नाही असे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.