सुखदुखाचा मनावर परिणाम होऊ न देणारा मोक्षलाभास पात्र होतो
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, प्रत्येकाच्या शरीरात असलेला आत्मा ही कायम टिकणारी वस्तु असून ती अविनाशी आहे, हे जो जाणतो त्याला तात्पुरते अस्तित्व असलेल्या शरीराचा नाश झाला तरी दु:ख होत नाही. हे जग खरे आहे असे मानणारा मनुष्य मात्र इंद्रियांच्या ताब्यात जाऊन, त्यांनी दाखवलेल्या प्रलोभनाला बळी पडून, सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो. धैर्यशील, ज्ञानी पुरुष मात्र ह्या इंद्रियांना दाद देत नाही कारण विषयसेवनातून मिळणाऱ्या सुखदु:खांशी त्याला काहीच देणेघेणे नसते. त्यामुळे तो मोक्षलाभास पात्र होतो. हे तत्वज्ञान जाणणारे ज्ञानी जीवनाकडे तटस्थ वृत्तीने बघतात. मनुष्य देहात असलेल्या ईश्वरी अंशाला जीवात्मा किंवा जीव असे म्हणतात. ह्या जीवाला त्याने प्रवेश केलेल्या शरीराबद्दल ममत्व वाटू लागते. त्यात ज्ञानेंद्रिये त्याला विषयांची ओळख करून देतात. ते भोगण्यासाठी तो धडपडू लागतो. त्यासाठी स्वत:चे मूळ स्वरूप विसरून, तो खालच्या पायरीवर उतरतो आणि स्वत:ला कर्ता म्हणवतो. त्यामुळे स्वरूपाकडे जाण्यासाठी आवश्यक ते न करता देहातच अधिकाधिक गुरफटले जाण्याची घोडचुक करण्यावरच त्याचा भर असतो. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, धैर्यशील, ज्ञानी पुरुषांवर मात्र विषयांची मात्रा चालत नाही कारण विषयसेवनातून मिळणाऱ्या सुखदु:खांशी त्यांना काहीच देणेघेणे नसते. त्यामुळे ते मोक्षलाभास योग्य असतात.
ह्यांची मात्रा न चाले चि ज्या धीर पुरूषावरी । सम देखे सुखे दु:खे मोक्ष-लाभास योग्य तो ।।15।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्या पुरुषाला सुखदु:खाचे प्रसंग तात्पुरते असतात हे माहित असते तो त्यांच्या तावडीत सापडत नाही, त्याचा सुखदु:खाच्या प्रसंगी मनावर ताबा असल्याने तो संयमाने वागतो. तो त्या दोन्ही प्रसंगाकडे अलिप्तपणे पहात असतो. त्यामुळे त्याला परिस्थितीत कोणताही बदल व्हावा किंवा असं घडलं तर बरं होईल असे वाटत नाही. आपण कर्ते नाही अशी त्याला खात्री असल्याने जे घडतंय ते ईश्वरी इच्छेनुसार घडतंय आणि तेच आपल्या भल्याचं ह्या विचाराने त्याच्या मनाची कोणत्याही प्रसंगी चलबिचल होत नाही. त्यामुळे तो मोक्षलाभास पात्र होतो. इंद्रियांना आवडणाऱ्या विषयांच्या आधीन न होणारा सुखदु:खाच्या दुष्टचक्रात सापडत नाही. असा मनुष्य पूर्णपणे ब्रम्हरूप आहे असे जाणावे.
भगवंत पुढील श्लोकात सांगतात की, संत मंडळीनी असा निर्णय केला आहे की, मिथ्या वस्तूला कधीच अस्तित्व नसते आणि सत्य गोष्टीचा कधी नाश होत नाही.
नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाश हि । निवाडा देखिला संती ह्या दोहींचा अशापरी ।।16।।
संत, साधू, सत्पुरुष हे जाणून असतात की, समोर दिसणारे जग ही ईश्वराची लीला आहे आणि तिची निर्मिती मायेच्या सहाय्याने झालेली आहे. मायेने तयार केलेली प्रत्येक वस्तू ही कायम टिकणारी नसते म्हणून ती खोटी असते. जरी ती समोर दिसत असली तरी नाशवंत असल्याने, मिथ्या आहे. देहासकट समोर दिसणाऱ्या सर्व वस्तुत चैतन्य म्हणजे ईश्वरी अस्तित्व गुप्तरूपाने वास करत असते. ते मात्र सत्य असल्याने त्याचा कधीही नाश होत नाही. लहान मुलांना त्यांचे आईवडील सांगत असतात की कोणत्याही वस्तूला पाय लावू नये, चुकून लागलाच तर नमस्कार करावा. हे सांगण्यामागचा उद्देश असा असतो की, जरी दिसत नसला तरी प्रत्येक सजीवनिर्जीव वस्तुत देव आहे ह्याची जाणीव लहान मुलांना व्हावी.
क्रमश: