निरपेक्षतेने कर्मे करणाऱ्याला पूर्वजन्मीचे आठवत असते
अध्याय तिसरा
पूर्वीच्या काळी बाप्पांनी सांगितलेला कर्मयोग पुढे खूप काळ लोटल्यानंतर नष्ट झाला कारण त्यावर कोणाची श्रद्धा राहिली नाही. निरपेक्ष कर्म करून स्वत:चे भले करून घ्यायला महत्त्व न देता आज, आत्ता ताबडतोब जे हवे ते मिळवण्यासाठी सकाम अनुष्ठाने करायला लोक एका पायावर तयार होऊ लागले. साहजिकच बाप्पांच्या योगाचे महत्त्व हळूहळू कमी होत गेल्याने सध्याच्या कलियुगात तो नष्ट होताना दिसत आहे. बाप्पांनी हे सर्व राजाला सविस्तर सांगितलं.
त्यावर राजाने बाप्पांना विचारले, गजानना, तू तर सांप्रत गर्भापासून उत्पन्न झाला आहेस मग हा उत्तम योग पूर्वी तू विष्णूला कसा सांगितलास? उत्तर म्हणून बाप्पा म्हणाले, तुझे आणि माझे देखील अनेक जन्म होऊन गेले आहेत. ते सर्व मी स्मरतो, तुला मात्र त्यांचे स्मरण नाही. स्वत:ला माहित नाही म्हणजे ते कुणालाच माहित नसणार असे लोक मानतात कारण ते स्वत:ला फार शहाणे समजत असतात आणि आपल्या शहाणपणाचे प्रदर्शन करण्यासाठी ते समोरच्याला आडवेतिडवे प्रश्न विचारत असतात, ह्याची बाप्पाना कल्पना होती. वरेण्याच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून त्यांनी सांगितले की, पूर्वी माझे अनेक जन्म झालेले आहेत आणि मला ते आठवत आहेत. ह्याचे कारण म्हणजे कोणत्याही जन्मात मी केलेले कार्य निरपेक्षतेने केलेले असल्याने अपेक्षांचे ओझे माझ्या मनावर नसते. त्यामुळे माझ्या स्वच्छ मनात पूर्वीच्या जन्मांचे स्मरण राहते. वरेण्याचा त्यांच्या सांगण्यावर विश्वास बसावा अशी त्यांची इच्छा होती कारण ऐकणाऱ्याचा समोरच्यावर पूर्ण विश्वास बसला की, ऐकणारा समोरचा जे सांगतो त्याप्रमाणे निमुटपणे करायला तयार होतो. वरेण्याचा विश्वास संपादन करण्यासाठी बाप्पा पुढील श्लोकात पूर्वीपासून कोणकोणत्या रूपात प्रकट होऊन ते कार्य करत आहेत ते सांगत आहेत आपल्याला मागील जन्म का आठवत आहेत आणि इतरांना ते का आठवत नाहीत हे सकारण सांगितल्यावर बाप्पा पुढील श्लोकात त्यांच्यापासूनच इतर सर्व देव निर्माण झालेले आहेत हे सांगत आहेत. ते म्हणाले,
मत्त एव महाबाहो जाता विष्ण्वादय सुरा ।
मय्येव च लयं यान्ति प्रलयेषु युगे युगे ।। 7 ।।
अर्थ- हे महाबाहो, विष्णु आदिकरून देव माझ्यापासून उत्पन्न झाले आणि प्रलयकाली माझ्यामध्येच ते लय पावतात. येथे ह्याच आशयाचा तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. ओंकार प्रधान रूप गणेशाचे.. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान... आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू ...मकार महेश जाणियेला ... ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न ...तो हा गजानन मायबाप तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी........... पहावी पुराणी व्यासाचिया ....
अजो व्ययो हं भूतात्मा नादिरीश्वर एव च ।
आस्थाय त्रिगुणां मायां भवामि बहुयोनिषु ।। 9।।
अर्थ-जन्मरहित, नाशरहित, सर्व भूतांचा आत्मा आणि अनादि कालापासून ईश्वर असा मी आहे. त्रिगुणात्मक मायेचा आश्रय करून नानाप्रकारच्या योनींचे ठिकाणी मी जन्म घेतो. विवरण-सृष्टीतील सर्व जीवात आत्म्याच्या रूपाने बाप्पांचा वास असतो. देह नष्ट झाला तरी आत्मा म्हणजे देहातील ईश्वरी अंश अमर असतो. या आत्म्यावर मायेचे पांघरूण असल्याने तो सुखदु:ख इत्यादींचा अनुभव घेतो. आकाशात ढग दिसत असतात पण प्रत्यक्षात आकाश त्यांच्यापासून खूप उंच असल्याने ते आकाशाला स्पर्शही करू शकत नाहीत. त्याप्रमाणे बाप्पांनीच निर्माण केलेल्या मायेचा त्यांना स्पर्शही होत नसल्याने ते त्रिगुणांच्या पलीकडे आहेत. साहजिकच त्यांनीच निर्माण केलेल्या प्राणीमात्रापेक्षा ते वेगळे आहेत. ते चिरंतन असल्यामुळे त्यांच्याबाबतीत जन्मणे, मरणे आणि वाढणे ही तिन्हीही प्रकार नाहीत.