For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाप्पांच्या उपदेशानुसार जो वागतो तो वंद्य होतो

06:41 AM May 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
बाप्पांच्या उपदेशानुसार जो वागतो तो वंद्य होतो
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

बाप्पा उत्तम भक्ताची लक्षणे सांगत आहेत. त्यानुसार तो शत्रूमित्र, लाभालाभ, सुखदु:ख या सर्वांबद्दल तटस्थ असतो, ज्याला पाहून जन भय पावत नाहीत, लोकांना पाहून त्याला उद्वेग येत नाही, त्याला कुणाचीही भीती वाटत नाही, तो क्रोधापासून दूर असतो, शत्रु, मित्र, निंदा, स्तुति, शोक हे सर्व त्याला सारखेच वाटत असतात, तो सदैव आनंदी असतो, मौनी असतो, त्याची बुद्धि व भक्ति निश्चल असते आणि तो संगरहित असतो. असा भक्त बाप्पांना अत्यंत प्रिय असतो. मनुष्य ज्याचा ध्यास घेतो त्याचा त्याला सर्वत्र भास होऊ लागतो. या न्यायाने भक्ताला ईश्वराच्या अस्तित्वाची सर्वत्र जाणीव होऊ लागते. त्यामुळे सुखदु:ख, रागद्वेष, मानअपमान इत्यादि विकारांचा संग सोडून म्हणजे नाद सोडून तो असंग बनतो व कमलपत्राप्रमाणे अलिप्त, अस्पर्श राहतो. पुढील श्लोकात बाप्पा सांगतात की, अशी लक्षणे असलेला भक्त सर्वांना वंदनीय होतो.

संशीलयति यश्चैनमुपदेशं मया कृतम् ।

Advertisement

स वद्यऽ सर्वलोकेषु मुक्तात्मा मे प्रियऽ सदा ।।18 ।।

अर्थ-मी केलेल्या या उपदेशाशी जो वागतो तो सर्व लोकांमध्ये वंद्य होय, तो मुक्तात्मा होय, तो मला सर्वदा प्रिय असतो.

विवरण-बाप्पांनी सांगितलेली भक्तलक्षणे आपण समजून घेतली. अशी लक्षणे आपल्यातही यावीत असे आपल्याला वाटत असते पण ते इतके सहजी घडत नाही. कुठे ना कुठे काही ना काही चुका आपल्या हातून होत राहतात. पण या चुका आपण समजून घ्याव्यात आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा अशी बाप्पांची इच्छा आहे. त्यासाठी आपल्या चुका सुधारण्याचा आपला अभ्यास आपण चालू ठेवायला हवा. जेव्हा मूळ रस्ता चुकून आपण दुसऱ्याच मार्गाला लागतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की, तो रस्ता चुकलाय तेव्हा तो परत फिरून जिथं त्याचा रस्ता चुकला होता त्या ठिकाणी येतो आणि योग्य मार्गाने पुढं जातो. ही गोष्ट परमार्थात वारंवार करावी लागते. या गोष्टीला श्रीगोंदवलेकर महाराज अभ्यास असं म्हणतात आणि मुक्कामी पोहोचेस्तोवर असं करत राहणं ही तपश्चर्या होय. अशी तपश्चर्या करत राहिलं की, त्याची सवय आपोआपच आपल्याला होते. बाप्पांनी सांगितलेली भक्तलक्षणे आपल्या वर्तनातून व्यक्त व्हावीत व हळूहळू ती इतकी अंगवळणी पडावीत की, आपल्याला बाप्पांनी सांगितलेल्या उपदेशानुसार वागायचंय हे मुद्दामहून लक्षात ठेवायची गरज पडू नये. तो आपला सहजस्वभाव व्हावा. बाप्पांची अशी इच्छा आहे की, त्यांच्या उपदेशानुसार भक्तानं वर्तन करावं. अशा वर्तनाने तो सर्व लोकात वंदनीय होतो. अशा अहंकारवीरहीत, ममतारहीत, भक्ताचे सुखदु:ख, राग, लोभ, द्वेष, मान अपमान आदि विकार गळून पडलेले असतात. त्यामुळे तो देहबंधनातून मुक्त झालेला असतो. असा मुक्तात्मा बाप्पांना फार प्रिय असतो. पुढील श्लोकात बाप्पा म्हणतात, अमुक मिळाले म्हणून आनंदी, तमुक मिळालं नाही म्हणून दु:खी अशी भावना न बाळगणाऱ्या भक्ताला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान असते.

अनिष्टाप्तौ च न द्वेष्टीष्टप्राप्तौ च न तुष्यति ।

क्षेत्रतज्ञौ च यो वेत्ति समे प्रियतमो भवेत् ।। 19।।

अर्थ-अनिष्टप्राप्ति झाली असता जो द्वेष करीत नाही, इष्टप्राप्ति झाली असता जो संतोष पावत नाही, क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांना जो जाणतो तो मला अत्यंत प्रिय आहे.

विवरण-स्वत:ला कर्ता समजणारा मनुष्य मनात काही तरी हेतू धरून कर्म करत असतो पण दरवेळी त्याच्या मनासारखं होतंच असं नाही. आपण केलेले कष्ट वाया गेले असे त्याला वाटत असते. त्यामुळे जे फळ मिळालेलं आहे त्यावर तो समाधानी नसतो. कष्टाच्या मानानं मिळालेलं फळ अपेक्षेप्रमाणे नसल्याने हा आपल्यावर अन्यायच आहे अशा समजातून तो मिळालेल्या फळाचा द्वेषही करत असतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.