खड्डे बुजविण्यासाठी आठवड्याचा अल्टिमेटम
मुख्यमंत्र्यांची बेंगळुरातील अधिकाऱ्यांना सूचना
बेंगळूर : राज्यातील काही उद्योजकांनी बेंगळूर शहरातील खड्डेमय रस्त्यांवरून सरकारवर टिप्पणी केली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी उद्योजक किरण मुझुमदार शाह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन शहरातील रस्ते विकासासंबंधी चर्चा केली आहे. दरम्यान, याची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळूरमधील रस्त्यांवरील खड्डे आठवडाभरात बुजवावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी मागील महिन्यात बेंगळूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.
ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाचे मुख्य आयुक्त महेश्वर राव आणि नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ यांच्यासह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. खड्डे आठवडाभरात बुजविण्याची सूचना दिली आहे,असे त्यांनी सांगितले. गांधीनगर मतदारसंघात व्हाईट टॅपिंगसह रस्त्यांच्या विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पावसामुळे खड्डे बुजविण्यास विलंब होत आहे. यंदा पाऊस अधिक झाला आहे. शहरातील विविध भागात व्हाईट टॅपिंगचे काम सुरू आहे. हे रस्ते 25 ते 30 वर्षे टिकतात. त्यामुळे खड्ड्यांची समस्या कमी होण्यास मदत होईल, असे सिद्धरामय्या म्हणाले.
सर्व आमदारांना निधी
सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी निधी दिला जात आहे. याकरिता अर्थसंकल्पात 8,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील आमदारांना, विरोधी पक्षातील आमदारांनाही विकास निधी दिला जात आहे. सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.